मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा दोनशेवा आणि अखेरचा क्रिकेट सामना वानखेडेवर होणार असल्याने या निमित्ताने कांदिवलीतील जिमखान्याला सचिनचे नाव ११ नोव्हेंबर रोजी देण्याचे जाहीर झाले आहे. त्यानंतर १३ नोव्हेंबरला वानखेडेवरील अत्याधुनिक पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जाणार आहे. हे दोन सोहळे होण्याआधीच वांद्रे-कुर्ला संकुलातील एमसीएच्या वास्तूवर ‘शरद पवार इन्डोअर क्रिकेट अकादमी’ची पाटी अधिकृत कार्यक्रमाशिवाय दहा दिवसांपासून झळकू लागली आहे!
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आरूढ झाल्यावर मंगळवारी शरद पवार यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सचिनच्या ऐतिहासिक सामन्यानिमित्त होणाऱ्या नामकरणांची घोषणा केली. कांदिवलीतील  नामकरण सोहळ्यात सचिनचा हृद्य सत्कारही होणार आहे. १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत वानखेडेवर दोनशेव्या कसोटीनिशी सचिन आपल्या कसोटी कारकिर्दीला अलविदा करणार आहे.
कांदिवलीच्या कार्यक्रमाची तारीख निश्चित झाली असली तरी अद्याप सचिन तेंडुलकर यांच्या नामफलकाचे कामही सुरू झाले नाही. पण नामकरण सोहळ्याची तारीखसुद्धा न ठरलेल्या बीकेसी येथील एमसीएच्या वास्तूवर मात्र शरद पवार यांच्या नावाची पाटी दिमाखात झळकूही लागली आहे.
याबाबत छेडले असता ‘एमसीए’चे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी म्हणाले की, ‘‘सचिनच्या दोनशेव्या सामन्यानंतर बीकेसीच्या वास्तूला शरद पवार यांचे नाव देण्याचा कार्यक्रम होणार आहे.’’ एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत म्हणाले की, ‘‘या वास्तूला पवारांचे नाव देण्याचा निर्णय १४ मे २०१३ रोजी एमसीए कार्यकारिणी बैठकीत झाला आहे. सध्या सचिनच्या कसोटीची धामधूम आहे. त्यानंतर या नामकरणाचा अधिकृत कार्यक्रम घेण्यात येईल.’’
१४ डिसेंबर २००७ या दिवशी एमसीएचे अध्यक्ष असताना पवार यांनीच या वास्तूचे उद्घाटन केले होते.

Story img Loader