मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी सरावासाठी सचिन मुंबईच्या हरयाणाविरुद्धच्या सामन्यात खेळत आहे. सचिनचा हा अखेरचा रणजी सामना असणार आहे. हा सामना लाहली, रोहतक येथे सुरू असल्याने सचिनचा रणजी अलविदा घरच्या मैदानावर होणार नाही, हे लक्षात घेऊन मुंबई क्रिकेट असोसिएशनने लाहलीमध्ये एका हृद्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी संध्याकाळी मैदानानजीकच्या एका सभागृहात हा सोहळा झाला. एमसीएचे संयुक्त सचिव नितीन दलाल या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून लाहलीला आले होते.
दलाल यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या, यानंतर पुष्पगुच्छ देऊन सचिनला गौरवण्यात आले. यानंतर मुंबई संघातील सदस्यांनी सचिनविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिनच्या आणखी पाच खेळी शिल्लक असून त्याने यामध्ये दोन तरी शतके झळकावीत असे झहीर खानने सांगितले. सचिन दुसऱ्या टोकाला असताना गार्ड घेतल्याची आठवण अजिंक्य रहाणेने सांगितली. दरम्यान कारकिर्दीत अवघड कालखंडातून जात असताना सचिनने केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे अभिषेक नायरने सांगितले. महान क्रिकेटपटू असूनही माणूस म्हणूनही सचिन तितकाच मोठा आहे, असे वसिम जाफरने सांगितले. खेळाइतकाच सचिनचा फिजिओथेरपीचा सखोल अभ्यास असल्याचे मुंबई संघाचे फिजिओथेरपिस्ट निरंजन पंडित यांनी सांगितले. सचिनला पाहत लहानाचे मोठे झालेले अनेक युवा खेळाडू सचिनविषयी बोलताना भावुक झाले होते. सचिनसह खेळण्याची संधी मिळेल असे कधी वाटले नव्हते असे यापैकी अनेकांनी सांगितले.
१५ वर्षांखालील क्रिकेट खेळत असल्यापासून पाठिंबा देणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिनने आभार मानले. ‘प्रत्येकजण काही उद्दिष्ट घेऊन जन्माला येतो आणि प्रत्येकात काहीतरी उपजत क्षमता असते. स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी मी प्रयत्न केले. आपल्या ध्येयासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी हवी. मी जे काही मिळवले आहे ते मेहनतीमुळेच. यश मिळवल्यानंतर नम्र राहणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे मी अर्जुनला सांगतो. यश आणि अपयश वैयक्तिक आयुष्यात येतच राहतात, आपण नम्र राहिल्यास त्यांचा यथोचितपणे सामना करता येतो. स्थैर्य राखणे फार आवश्यक आहे. लक्ष्याच्या दृष्टीने अपार मेहनत करा, मात्र यशाचा विचार करू नका. तयारी करणे आपल्या हातात आहे, पण यशापयश नाही. मेहनतीला पर्याय नाही’, अशा शब्दांत सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा