एकीकडे आयपीएलचा ज्वर चढत असताना संघटनात्मक राजकारणही जबरदस्त तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडेहून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवल्याच्या निषेधार्थ मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली स्पर्धेची ओळखपत्रे आयोजकांच्या स्वाधीन केली असून यापुढे आयपीएलच्या कार्यक्रमापासून लांब राहण्याचे त्यांनी ठरवले आहे.
शनिवारी बीसीसीआयने वानखेडे स्टेडियमवरून दोन सामने हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा वानखेडेवर सामना सुरू असताना एमसीएचे पदाधिकारी सामना हलवण्याबाबतचे कारण समजण्याची वाट पाहात होते, पण सामना हलवण्यामागचे सबळ कारण न मिळाल्याने एमसीएच्या पदधिकाऱ्यांनी सामन्यानंतर आपली ओळखपत्रे आयोजकांच्या स्वाधीन केली आणि त्यांनी सामन्याच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावरही बहिष्कार टाकला.
‘‘आम्ही सर्वानी आयपीएलची ओळखपत्रे आयोजकांच्या स्वाधीन केली आहेत. एमसीएचे कार्यालयीन पदाधिकारी, कार्यकारी समिती सदस्य आणि स्वयंसेवकांचा यामध्ये समावेश आहे. अंतिम फेरीचा सामना बीसीसीआयने आमच्याकडून हलवून बंगळुरूला खेळवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे कोणतेही सबळ कारण न दिल्याने आम्हाला असे करावे लागले,’’ असे आयपीएलचे प्रसारमाध्यम व्यवस्थापक आणि एमसीएचे सरचिटणीस विनोद देशपांडे यांनी सांगितले.
शनिवारी झालेल्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीमध्ये यंदाच्या स्पर्धेचा १ जूनला होणारा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमऐवजी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आणि २८ मे रोजी वानखेडेवर होणारा ‘एलिमिनेटर’चा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आयपीएलच्या नियमांनुसार स्पर्धेच्या गतविजेत्याला अंतिम सामना आणि ‘प्ले-ऑफ’मधील एका सामन्याचे यजमानपद देण्यात येते. पण या वेळी स्पर्धेदरम्यान झालेल्या दोन्ही संघटनांमधील पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्याने आयपीएल प्रशासकीय समितीने हा अनाकलनीय निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये गेल्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीला वाहनतळाची अपुरी व्यवस्था केल्याचे स्पर्धेचे प्रमुख रणजिब बिस्वाल यांनी म्हटले होते. पण त्या वेळी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या गाडय़ा स्टेडियमच्या बाहेर लावत आयपीएलच्या बैठकीसाठी वाहनतळाची व्यवस्था केली होती. काही दिवसांपूर्वी एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निलंबनाच्या कारवाईबाबत भाष्य केले होते आणि त्याची परिणती मुंबईला आयपीएलचे सामने गमावण्यामध्ये झाली, असे म्हटले जात आहे.
आयपीएलच्या पुढच्या सामन्यांवर एमसीएचा बहिष्कार?
एकीकडे आयपीएलचा ज्वर चढत असताना संघटनात्मक राजकारणही जबरदस्त तापले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पर्धेचा अंतिम सामना वानखेडेहून बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हलवल्याच्या निषेधार्थ मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली स्पर्धेची ओळखपत्रे आयोजकांच्या स्वाधीन केली असून यापुढे आयपीएलच्या कार्यक्रमापासून लांब राहण्याचे त्यांनी ठरवले आहे.
First published on: 12-05-2014 at 01:03 IST
TOPICSएमसीएMCAमराठीMarathiमराठी बातम्याMarathi Newsवीरेंद्र सेहवागVirender Sehwagस्पोर्ट्स न्यूजSports News
+ 1 More
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca protests over losing ipl final