पंचवीस वर्षांपूर्वी देशाचे नावलौकिक करतील असे गोलंदाज घडवण्याची योजना मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) यशस्वीपणे राबवली होती. त्याचीच पुनरावृत्ती करताना ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या योजनेची घोषणा एमसीएने गुरुवारी केली.
मुंबईचा आणि भारताचा संघ अधिक मजबूत होण्यासाठी एमसीए-आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स बोलिंग फाऊंडेशनच्या योजनेचे एमसीएचे उपाध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी अनावरण केले. या वेळी वेंगसरकर म्हणाले, ‘‘१९७७-७८ मध्ये मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर थॉमसनच्या गोलंदाजीचा सामना केला होता. त्या वेळी मी २१ वर्षांचा होतो. ऑस्ट्रेलियाने ती मालिका ३-२ अशा फरकाने जिंकली होती. थॉमसन हे वेगवान गोलंदाजांना तर साईराज बहुतुले फिरकी गोलंदाजांना मार्गदर्शन करतील.’’
सिडनीमध्ये जन्मलेल्या ६४ वर्षीय थॉमसनला क्रिकेटविश्वात ‘थोम्मो’ या टोपणनावाने ओळखले जायचे. १९७०च्या दशकात वेगवान गोलंदाज डेनिस लिली आणि थॉमसन यांची क्रिकेटजगतावर दहशत होती. सप्टेंबरमध्ये स्थानिक हंगाम सुरू होण्याआधी थॉमसन महिनाभर भारत दौऱ्यावर येणार असून, या वेळी निवडक उदयोन्मुख गोलंदाजांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर हंगाम संपल्यानंतर मे महिन्यात ते आणखी एक महिला येणार आहेत. थॉमसन यांच्याशी दोन वर्षांचा करार झाला असून, याबाबतच्या मानधनाची रक्कम मात्र कळू शकली नाही.
एमसीएच्या निवड समिती प्रमुख मिलिंद रेगे आणि मुंबईचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित ‘बोलिंग फाऊंडेशन’ योजनेसाठी प्रत्येकी ३० वेगवान आणि फिरकी गोलंदाजांची निवड करतील.
इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज फ्रँक टायसन यांच्या मार्गदर्शनाखाली १९९० मध्ये बीसीए-मफतलाल गोलंदाज योजना मुंबईत राबवण्यात आली होती. त्या वेळी अ‍ॅबी कुरुविल्ला, सलिल अंकोला, पारस म्हांब्रे, बहुतुले आणि नीलेश कुलकर्णी हे गोलंदाज गवसले होते. जे मुंबईसाठी आणि भारतासाठी खेळले. यंदाची संकल्पना मकरंद वायंगणकर यांची आहे. मुंबईचे माजी क्रिकेटपटू विघ्नेश शहाणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स यांनी प्रायोजकत्व स्वीकारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा