सुट्टीच्या दिवशी आझाद, ओव्हल मैदान तसेच शिवाजी पार्क येथे हुल्लडबाजीचा अडथळा न येता सामने आयोजित करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) पोलिसांकडे मदत मागितली आहे. एमसीएचे सहसचिव नितीन दलाल आणि पी.व्ही. शेट्टी यांनी यासंदर्भात गृहमंत्री आर.आर. पाटील यांना पत्र लिहिले आहे. एमसीए प्रमाणित सामने सुरू झाल्यानंतर मैदानावरील अन्य खेळाडू आणि संघांनी मैदान खाली करावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हौशी खेळाडू शस्त्रांचा धाक दाखवून एमसीएच्या खेळाडूंना तसेच पंचांना धमकावतात आणि त्यांना निर्धारित वेळेत मैदानावर खेळू देत नाहीत. हौशी खेळाडू आणि एमसीए यांच्यात असलेल्या अलिखित धोरणाप्रमाणे टेनिस चेंडूनिशी खेळणारे सकाळी ७ ते ९ या कालावधीत मैदानावर खेळू शकतात, मात्र त्यानंतर दिवस संपेपर्यंत एमसीएचे सामने होतात. मात्र या धोरणाची पायमल्ली होत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात या मैदानांच्या नजीकच्या पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली आहे, मात्र पोलिस कारवाई करत नाहीत आणि एमसीएचे पदाधिकारी, खेळाडू तसेच पंच यांना समाजकंटकांपासून रोखण्यास टाळाटाळ करतात. दिवसेंदिवस या प्रश्नाची तीव्रता वाढत चालली आहे. सुट्टीच्या दिवशी सकाळी ९.३० ते संध्याकाळी ४.४५ या वेळेत मैदानांवर सुरक्षा पुरवावी असे या पत्रात म्हटले आहे.
या पत्राची प्रत एमसीएचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुंबई पोलीस आयुक्तांनाही पाठवण्यात आली
आहे.