वानखेडे स्टेडियमच्या पत्रकार कक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) देणार की नाही, यावर सर्वच स्तरांवर चर्वितचर्वण सुरू असून या संदर्भातील निर्णयाचे पडसाद आगामी निवडणुकीवर पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी एमसीएची महत्त्वपूर्ण कार्यकारिणी समितीची बैठक होणार असून या बैठकीमध्ये पत्रकार कक्षाच्या नामकरण विधीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.
एमसीएशी संलग्न असलेल्या काही क्लब्जनी पत्रकार कक्षाला बाळासाहेबांचे नाव द्यावे, असे पत्र पाठवले आहे. हा विषय मार्च महिन्यात झालेल्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आला होता, पण हा प्रस्ताव कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये मांडला जावा, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. हा विषय बैठकीच्या चर्चेच्या यादीत नसला तरी यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे, असे एमसीएमधील एका सूत्राने सांगितले.
या बैठकीमध्ये एमसीएचे माजी उपाध्यक्ष प्रो. रत्नाकर शेट्टी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. २८ डिसेंबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यांना एमसीएने कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्या या कृतीवर नेमकी काय कारवाई करायची, हा निर्णयही मंगळवारच्या बैठकीमध्ये होणार आहे.

Story img Loader