भारत-वेस्ट इंडिज कसोटी सामना संपल्यानंतर काही दिवसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन(एमसीए)तर्फे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. एमसीएकडून सचिनचा अतिशय शानदार पद्धतीने सन्मान करण्यात येईल, अशी माहिती एमसीएचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘सचिनला आपल्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या कसोटी सामन्याकडे लक्ष केंद्रित करता यावे याकरिता आम्ही त्याचा विशेष सत्कार या मालिकेनंतर करणार आहोत. मुंबईकरांच्या साक्षीने त्याने चांगले प्रदर्शन करावे आणि चांगल्या आठवणी घेऊन जाव्यात, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच त्याची एकाग्रता भंग पावणार नाही असे आम्हाला काहीही करायचे नाही.’’
‘‘१४ नोव्हेंबरला कसोटी सामना सुरू व्हायच्या आधी सचिनच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे. याचप्रमाणे बीसीसीआयकडूनही त्याला सन्मानित करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती सावंत यांनी दिली.
ऑनलाइन तिकीट विक्री आज सकाळी ११ वाजता
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर १४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील दोनशेवा आणि अखेरचा कसोटी सामना पाहायचा असेल तर क्रिकेटरसिकांना सोमवारी सकाळी ऑनलाइन तिकिटांसाठी सज्ज राहायला हवे. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ६६६.‘८ं९ल्लॠं.ूे या वेबसाइटवर तिकीट विक्री होणार आहे. पाचशे, एक हजार आणि अडीच हजार रुपये दरांची तिकिटे उपलब्ध असणार असून, प्रत्येक व्यक्तीला दोन तिकिट्स ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येईल. या संदर्भात अधिक माहितीसाठी क्याझुंगाच्या वेबसाइटवर किंवा  +९१-२२-२६३७६६०० या क्रमांकावर संपर्क साधावा. या कसोटी सामन्याची सर्वसामान्य क्रिकेटरसिकांसाठी पाच हजार तिकिट्स उपलब्ध असणार आहेत.
आज सचिन तेंडुलकर जिमखाना नामकरण
कांदिवली पश्चिमेकडील महावीरनगर परिसरातील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अलिशान जिमखान्याला सोमवारी ‘सचिन तेंडुलकर जिमखाना’ हे नाव देण्यात येणार आहे. या वास्तूचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्यासहित भारत आणि वेस्ट इंडिज असे दोन्ही संघ हजर राहणार आहेत.

 

Story img Loader