नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार खेचत महेंद्रसिंग धोनीने भारताला ऐतिहासिक विश्वविजेतेपद मिळवून दिले, मात्र अंतिम सामन्याच्या वेळी विकल्या न गेलेल्या तिकिटांचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. हे कोडे सुटावे यासाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने ३३० संलग्न क्लब्सना अधिक माहितीसाठी विचारणा केली आहे.
२०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या वेळी सर्व तिकिटे विकली गेल्याचा दावा एमसीएने केला होता. प्रत्यक्षात मात्र सामन्याची ४०० तिकिटे विकलीच गेली नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. विश्वचषकासारख्या मानाच्या स्पर्धेत झालेल्या या गोंधळामुळे एमसीएने या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी चार सदस्यीय समितीची नियुक्ती केली.
असोसिएशनशी संलग्न क्लब्सना यासंदर्भात काही अधिक माहिती आहे का? याची विचारणा करण्याचा सल्ला या समितीने दिल्याचे एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी सांगितले. माहिती देण्यासाठी १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. सुमारे ७८ लाख रुपयांच्या या विकल्या न गेलेल्या तिकिटांचा गोंधळ विश्वचषकाला दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही संपलेला नाही. एमसीएमधील अंतर्गत राजकारणामुळे हा प्रकार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. २२ मार्चला होणाऱ्या एमसीएच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा होणार आहे.