फलंदाजधार्जिणी खेळपट्टी तयार केल्याप्रकरणी क्युरेटर सुधीर नाईक यांना भारतीय संघ संचालक रवी शास्त्री यांनी शिवीगाळ केली होती. या गंभीर आरोपांप्रकरणी रवी शास्त्री यांच्यावर कारवाईबाबतचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी समितीच्या ३० ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सुधीर नाईक यांच्याकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल’, असे एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवी लढत वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेने क्विंटन डी कॉक, ए बी डी’व्हिलियर्स आणि फॅफ डू प्लेसिस यांच्या शतकांच्या जोरावर ४३८ धावांचा डोंगर उभारला. नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या धावसंख्येने भारताची मालिका विजयाची शक्यता हिरावून घेतली. मानहानीकारक पराभव होणार लक्षात आल्यामुळे भारतीय संघ संचालक रवी शास्त्री यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव संपल्यानंतर क्युरेटर सुधीर नाईक यांना उद्देशून उपहासात्मक टिप्पणी केली. यानंतर त्यांनी मराठीतून नाईक यांना शिवीगाळ केली आणि पाटा विकेट तयार केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
माजी क्रिकेटपटू आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संबंधित तीन प्रमुख स्टेडियमच्या खेळपट्टय़ांची जबाबदारी सांभाळणाऱ्या नाईक यांनी संघटनेला या प्रकरणाची माहिती दिली. असंसदीय शब्दांत शास्त्री यांनी टीका केल्याचे नाईक यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे. भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बी. अरुण यांनी नाईक यांचे साहाय्यक मामुणकर यांच्यावर टीका केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला फिरकीला अनुकूल खेळपट्टी हवी होती. मात्र आयत्या वेळी अशी खेळपट्टी तयार करणे शक्य नसल्याचे नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियात विराट कोहलीने एका भारतीय पत्रकाराला उद्देशून शिवीगाळ केली होती. त्या वेळी ज्या पद्धतीने चौकशी करण्यात आली होती, त्याच पद्धतीने या प्रकरणाची चौकशी होईल असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

मांजरेकरांची
शास्त्रींवर टीका
क्युरेटर सुधीर नाईक यांना शिवीगाळ करणाऱ्या रवी शास्त्री यांच्या कृतीवर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी टीका केली आहे. नाईक यांच्यासारख्या माजी क्रिकेटपटू आणि बुजुर्ग व्यक्तीला शिवीगाळ करणे शास्त्री यांना शोभत नाही, अशा शब्दांत मांजरेकर यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca will take decision about ravi shastri in next meeting