ब्रेंडन मॅक्क्युलमच्या शानदार फटकेबाजीने शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जच्या तिसऱ्या विजयाचा अध्याय लिहिला आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्माने चार बळी घेत पाया रचला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर सात विकेट्स राखून आरामात विजय नोंदवला. आयपीएलच्या सातव्या मोसमातील ओळीने तिन्ही सामन्यांत पराभव पत्करल्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सला आपले खाते अद्याप उघडता आलेले नाही.
१४२ धावांचे लक्ष्य स्वीकारलेल्या चेन्नईची सुरुवात छान झाली. ड्वेन स्मिथ (२९) आणि मॅक्क्युलम यांनी ५७ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यानंतर सुरेश रैना आणि फॅफ डय़ू प्लेसिस यांनी निराशा केली. पण मॅक्क्युलम आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आक्रमणाचे धोरण स्वीकारून चेन्नईच्या विजयावर ६ चेंडू शिल्लक असताना शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये मोहित शर्माने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला २० षटकांत ७ बाद १४१ धावसंख्येवर सीमित ठेवले. मोहितने १४ धावांत ४ बळी मिळवले, तर बेन हिल्फेनहॉसने ३९ धावांत २ बळी घेत त्याला छान साथ दिली. मोहितचे १९वे षटक मुंबई इंडियन्ससाठी खराब ठरले. त्याने अंबाती रायुडू, किरॉन पोलार्ड (१२) आणि हरभजन सिंग असे तीन महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या मुंबईला चांगली सलामी मिळाली नाही. माइक हसी (१) आणि आदित्य तरे (२३) लवकर माघारी परतले. मग मुंबईच्या डावात कर्णधार रोहित शर्मा आणि कोरे अँडरसन यांनी विशेष भूमिका बजावताना तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली. रोहितने ४१ चेंडूंत ५० धावा केल्या, यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. याचप्रमाणे अँडरसनने ३१ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह ३९ धावा केल्या. हे दोन फलंदाज बाद झाल्यावर अखेरच्या पाच षटकांत मुंबईला धावांचा ओघ वाढवता आला नाही. त्यांनी या षटकांमध्ये ३३ धावा केल्या, परंतु त्यांचे पाच फलंदाज बाद झाले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ७ बाद १४१ (रोहित शर्मा ५०, कोरे अँडरसन ३९; मोहित शर्मा ४/१४) पराभूत विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज : १९ षटकांत ३ बाद १४२ (ब्रेंडन मॅक्क्युलम नाबाद ७१, ड्वेन स्मिथ २९, फॅफ डय़ू प्लेसिस २०, हरभजन सिंग २/२७)
सामनावीर : मोहित शर्मा.
मोहित शर्मा ४/१४
आजचे सामने
*राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, वेळ : दुपारी ४ वा.
*कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब, वेळ : रात्री ८ वा.
* स्थळ : दुबई * थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स