फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे योग्य समन्वय सामना जिंकवून देऊ शकतो. दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज आपली कामगिरी चोख निभावत असले तरी नाबाद शतकवीर ब्रेन्डन मॅक्क्युलमचे दोन झेल सुटल्यामुळे भारताची सामन्यावरील पकड सुटल्याचे चित्र तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले. भेदक मारा करत भारताने न्यूझीलंडची ५ बाद ९४ अशी अवस्था केली होती, त्यावेळी एका डावाने विजयाचे स्वप्न भारतीय संघ पाहत होता. पण जीवदानांच्या जोरावर मॅक्क्युलमने नाबाद शतक झळकावल्यामुळे भारताचे हे स्वप्न भंगले आहे. मॅक्क्युलम आणि बी जे वॉटलिंग यांनी संघाचा डाव सावरला आणि दिवस अखेर ५ बाद २५२ अशी दमदार मजल मारून दिली. न्यूझीलंडकडे सध्या नाममात्र सहा धावांची आघाडी असली तरी तिसऱ्या दिवशी उंचावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर ते मोठी मजल मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भारताच्या २४८ धावांच्या आघाडीच्या ओझ्याखाली न्यूझीलंडचा संघ दबलेला पाहायला मिळाला. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच षटकात झहीर खानने केन विल्यमसनचा (७) अडसर दूर केला, त्यानंतर खेळपट्टीवर पाय रोवू पाहणाऱ्या हमिश रुदरफोर्डलाही (३५) तंबूत धाडत त्याने संघाला चांगली सुरुवात करून दिली. उपाहाराला सहा षटके बाकी असताना मोहम्मद शमीच्या २९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅक्क्युलमचा झेल सिली मिड ऑनला सोडत कोहलीने घोडचूक केली, त्या वेळी मॅक्क्युलम फक्त ९ धावांवर होता. उपाहाराला एक मिनिट शिल्लक असताना शमीने टॉम लॅथमला (२९) बाद करत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला. उपाहारापर्यंत त्यांची ४ बाद ८७ अशी अवस्था करत भारतीय संघ वरचढ राहिला होता. उपाहारानंतर लगेचच कोरे अँडरसनला (२) न्यूझीलंडने गमावला आणि ५ बाद ९४ अशी धावसंख्या झाल्यावर यजमान पराभवाच्या छायेमध्ये दिसत होते.
उपाहारानंतर तडफदार फलंदाज मॅक्क्युलम सावधपणे धावा काढत होता. इशांत शर्माने ५५व्या षटकात आपल्याच गोलंदाजीवर मॅक्क्युलमचा झेल सोडला, त्या वेळी तो ३६ धावांवर होता. त्यानंतर मात्र मॅक्क्युलम अधिक सावध झाला. त्यामुळे दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर वेळ काढत २९.५ षटकांत त्यांना फक्त ५९ धावा जमवता आल्या.
तिसऱ्या सत्रात मात्र सुदैवी मॅक्क्युलमच्या खेळाला वेग आला. दुसऱ्या टोकाकडून वॉटलिंग खेळपट्टीवर नांगर टाकून उभाच होता. विकेट न गमावता धावा जमवायच्या, ही रणनीती या दोघांनी तिसऱ्या सत्रात यशस्वी करून दाखवली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५६ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाची गाडी रुळावर आणली. दोन जीवदानांनंतर मॅक्क्युलमने १४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ११४ धावा फटकावल्या, तर वॉटलिंग त्याला चांगली साथ देत २०८ चेंडूंत ४ चौकारांच्या जोडीने नाबाद ५२ धावांची खेळी साकारली.
धावफलक
न्यूझीलंड (पहिला डाव) : १९२
भारत (पहिला डाव) : ४३८
न्यूझीलंड (दुसरा डाव) : पीटर फुल्टन पायचीत गो. झहीर १, हमिश रुदरफोर्ड झे. धोनी गो. झहीर ३७, केन विल्यमसन झे. धोनी गो. झहीर ७, टॉम लॅथम झे. धोनी गो. शमी २९, ब्रेन्डन मॅक्क्युलम खेळत आहे ११४, कोरे अँडरसन झे. व गो. जडेजा २, बी जे वॉटलिंग खेळत आहे ५२, अवांतर (बाइज २, लेग बाइज ६, नो बॉल ४) १२, एकूण ९९ षटकांत ५ बाद २५२.
बाद क्रम : १-१, २-२७, ३-५२, ४-८७, ५-९४.
गोलंदाजी : इशांत शर्मा २३-३-६३-०, झहीर खान २५-८-६०-३, मोहम्मद शमी २५-४-७२-१, रवींद्र जडेजा २६-६-४९-१.
सामन्यात आतापर्यंत दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. आम्हाला सामना जिंकण्याची ही चांगली संधी आहे. जर उद्या आम्ही दोन बळी झटपट मिळवले तर आमच्या हातात बराच अवधी असेल. ज्या पद्धतीने खेळ झाला त्यावर आम्ही खूश आहोत. संघाचे क्षेत्ररक्षण उत्तम आहे. दक्षिण आफ्रिकेत आणि या दौऱ्यावरही आम्ही चांगले झेल टिपले आहेत. एखाद-दुसरे झेल आमच्याकडून सुटले. पण सामन्यावर आमची अजूनही पकड कायम आहे.
चेतेश्वर पुजारा, भारतीय फलंदाज
दिवसाच्या पहिल्या तासाच्या खेळानंतर संघाची स्थिती चांगली नव्हती. पण मॅक्क्युलम आणि वॉल्टिंग यांच्यांमध्ये सुरेख भागीदारी झाली आणि यामुळे सोमवारच्या खेळासाठी संघाचे मनोबल उंचावले. सकाळी फलंदाज चाचपडत होते. पण या भागीदारीने आम्हाला सावरले. सोमवारीही आमची परीक्षा असेल. जर चांगली फलंदाजी झाली तर भारतावर दडपण टाकण्याची आमच्याकडे संधी असेल.
बॉब कार्टर, न्यूझीलंडचे सहाय्यक प्रशिक्षक
झेल सुटले, पकड सुटली!
फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे योग्य समन्वय सामना जिंकवून देऊ शकतो. दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज आपली कामगिरी चोख निभावत असले तरी नाबाद शतकवीर ब्रेन्डन मॅक्क्युलमचे दोन झेल सुटल्यामुळे भारताची सामन्यावरील पकड सुटल्याचे चित्र तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाले.
First published on: 17-02-2014 at 03:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mccullum watling keep new zealand alive