आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा शेरा

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

पर्थच्या दुसऱ्या कसोटीप्रमाणेच मेलबर्नच्या तिसऱ्या खेळपट्टीची खेळपट्टीसुद्धा सामान्य दर्जाची असल्याचा शेरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिला आहे.

‘बॉक्सिंग डे’ कसोटी पार पडलेल्या मेलबर्न क्रिकेट क्लबवर भारताने १३७ धावांनी विजय मिळवल्यानंतर ‘आयसीसी’ने या खेळपट्टीवर सामान्य दर्जाची असल्याचे नमूद केले आहे, असे वृत्त ‘सिडनी मॉर्निग हेराल्ड’ने दिले आहे.

मागील वर्षी मेलबर्नला झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील अनिर्णीत कसोटी सामन्यानंतर ‘आयसीसी’ने या खेळपट्टीवर खराब असल्याचा शेरा दिल्यानंतर त्यांच्या खात्यावर तीन गैरवर्तणुकीचे गुण जमा होते. मात्र या सामन्यात मेलबर्नने थोडी सुधारणा केली आहे, असे म्हणता येईल. ‘आयसीसी’च्या नियमानुसार पाच वर्षांच्या मुदतीत कोणत्याही स्टेडियमबाबत पाच गैरवर्तणुकीचे गुण जमा झाल्यास त्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जा रद्द होतो.

मेलबर्नवर भारतीय संघाला ४४३ धावसंख्या उभारण्यासाठी दोन दिवस लागल्यामुळे ती चर्चेत आली. चेतेश्वर पुजाराने खेळपट्टीचे गुणधर्म समजून घेत चिवट खेळी साकारली. शेवटच्या तीन दिवसांत भारताच्या वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या २० पैकी १५ फलंदाजांना बाद केले.

क्युरेटर मॅट पेज यांच्या मार्गदर्शनाखाली मेलबर्नच्या खेळपट्टीत झपाटय़ाने सुधारणा होत आहे, हे दिलासादायक असल्याचे मेलबर्न क्रिकेट क्लबचे म्हणणे आहे, असे सदर वृत्तपत्रात म्हटले आहे.

सध्याच्या खेळपट्टय़ा या १५ वर्षे जुन्या असल्या तरी पुढील हंगामापर्यंत वापरल्या जातील. नवी खेळपट्टी तयार करण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पर्थमधील नव्या ऑप्टस स्टेडियमनंतर पुढच्याच सामन्यात मेलबर्नवर ठपका ठेवण्यात आल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांच्यासह सर्वानाच आश्चर्य वाटत आहे.

Story img Loader