ICC Cricket World Cup 2023, Pakistan vs Netherlands: पाकिस्तान क्रिकेट संघाने शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी विश्वचषक २०२३ मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात केली. बाबर आझमचा संघ पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध खेळायला आला होता. या सामन्यात नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात डळमळीत झाली. त्यांनी ९.१षटकांत ३८ धावांत तीन गडी गमावले. यात कर्णधार बाबरच्या विकेटचाही समावेश होता. त्यामुळे आता सोशल मीडिया युजर्स बाबर आझमला ट्रोल करत आहेत.
बाबर आझम सोशल मीडियावर ट्रोल –
बाबरला नेदरलँडच्या कॉलिन अकरमनने पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले होते. या डावात बाबर वाईटरित्या फ्लॉप ठरला आणि १८ चेंडू खेळून त्याला केवळ ५ धावा करता आल्या. क्रिकेटच्या महाकुंभातील या खराब सुरुवातीनंतर बाबरही सोशल मीडियावर ट्रोलचा निशाणा बनला. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल अनेक मजेदार मीम बनवले जाऊ लागले. त्याची खूप खिल्ली उडवली गेली. मात्र, या सुरुवातीनंतर पाकिस्तानचा डाव मोहम्मद रिझवान आणि सौद शकीलने सांभाळला आणि सुरुवातीच्या धक्क्यातून बऱ्यापैकी संघाला सावरले. पण बाबर आझम त्याच्या संथ फलंदाजी आणि फ्लॉप शोमुळे चर्चेचा विषय राहिला. एकदिवसीय विश्वचषकातील कर्णधार म्हणूनही हा त्याचा पहिलाच सामना आहे.
बाबर आझमबद्दल चाहत्यांच्या प्रतिक्रिया –
बाबरबाबत चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. त्याची आणि विराट कोहलीची अनेकदा तुलना केली जाते. अशा परिस्थितीत या खराब खेळीनंतर विराटचे चाहतेही सक्रिय झाले आणि त्यांनी बाबरचा अपमान करण्यासाठी मीम्स बनवण्यास सुरुवात केली. पाच धावांच्या या खेळीत बाबर सुरुवातीपासूनच अडचणीत दिसत होता. बाबर कधीच विराट कोहलीसारखा होऊ शकत नाही, असे विराटच्या चाहत्यांनी सांगितले. व्हायरल मीम्समध्ये, युजर्सनी खिल्ली उडवली की बाबरला कमकुवत संघांविरुद्धही धावा काढत नाही. अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत.
एकदिवसीय विश्वचषकात बाबर आझमची आकडेवारी –
बाबर आझमचा हा दुसरा एकदिवसीय विश्वचषक आहे. त्याने २०१९ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा खेळली होती. त्याने या स्पर्धेतील ८ डावात ४७४ धावा केल्या. मात्र, २०२३ च्या पहिल्याच सामन्यात तो फ्लॉप ठरला. एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत ९ सामन्यांच्या ९ डावात त्याच्या नावावर ४७९ धावा आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात त्याने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ९० च्या खाली आहे.