आशियाई क्रीडा स्पर्धेतील विजेतेपदासह ऑलिम्पिक तिकीट निश्चित करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघास ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत खडतर कसोटीला सामोरे जावे लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने या स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली आहे. भारतीय पुरुष संघाच्या साखळी गटात युरोपियन विजेता नेदरलँड्स, ऑलिम्पिक विजेता जर्मनी व पॅन अमेरिकन विजेता अर्जेटिना, तसेच आर्यलड व कॅनडा यांचा समावेश आहे. देवदोरो ऑलिम्पिक पार्क येथे ६ ते १९ ऑगस्ट दरम्यान हॉकीचे सामने होणार आहेत. पुरुष व महिला या दोन्ही गटांत प्रत्येकी बारा संघांचा समावेश आहे. पुरुष व महिला या दोन्ही विभागांत प्रत्येकी दोन साखळी गट असतील.
भारताचा महिला संघ ३६ वर्षांनी प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्यांना साखळी गटात जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका व अर्जेटिना यांच्याशी खेळावे लागणार आहे. भारताचा पहिला सामना ७ ऑगस्ट रोजी जपानबरोबर होणार आहे.
भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले, ‘आम्हाला सुरुवातीला तुल्यबळ संघांबरोबर खेळावे लागणार आहे. ही अवघड गोष्ट असली तरी खेळाडूंसाठी स्पर्धेत ताजेतवाने असतानाच बलाढय़ संघांविरुद्ध आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. ’
भारताचे सामने
पुरुष संघ :
६ ऑगस्ट आर्यलड
८ ऑगस्ट जर्मनी
९ ऑगस्ट अर्जेटिना
११ ऑगस्ट नेदरलँड्स
१२ ऑगस्ट कॅनडा
महिला संघ :
७ ऑगस्ट जपान
८ ऑगस्ट इंग्लंड
१० ऑगस्ट ऑस्ट्रेलिया
११ ऑगस्ट अमेरिका
१३ ऑगस्ट अर्जेटिना
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा