राउरकेला : स्पेनविरुद्धच्या विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघासमोर रविवारी ‘एफआयएच’ पुरुष विश्वचषक हॉकी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचे आव्हान असेल. भारताने ड-गटाच्या पहिल्या लढतीत स्पेनवर २-० असा विजय नोंदवला, मात्र इंग्लंडविरुद्ध विजय मिळवणे संघासाठी आव्हानात्मक असेल.

स्पेनविरुद्धच्या पहिल्या दोन सत्रांत भारताने आक्रमक खेळ केला आणि स्थानिक खेळाडू अमित रोहिदासच्या मदतीने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलमुळे भारताने आघाडी मिळवली व हार्दिक सिंगने ही आघाडी दुप्पट केली. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि उपकर्णधार रोहिदासने रक्षात्मक खेळही केला. इंग्लंडविरुद्धही भारताला चांगला रक्षात्मक खेळ करावा लागेल. इंग्लंडने वेल्सविरुद्धच्या विजयात सर्व चार सत्रांत गोल केले आहेत.

भारताची सर्वात कमकुवत बाजू ही पेनल्टी कॉर्नर राहिला आहे. स्पेनविरुद्धच्या पाच संधीपैकी एकाचाही फायदा त्यांना उचलता आला नाही. नजीकच्या काळात प्रत्येक स्पर्धेत संघाचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या हरमनप्रीतलाही पेनल्टी स्ट्रोकचे रूपांतर गोलमध्ये करण्यास अडथळा येत आहे. इंग्लंडविरुद्ध भारताने पेनल्टी कॉर्नरची संधी गमावल्यास त्याचा फटका संघाला बसू शकतो. भारतीय संघाचा प्रयत्न आपल्या गटात अव्वल स्थानी राहण्याचा असेल. ‘‘पहिल्या सामन्यात संघाने बचावात चांगला खेळ केला आणि चेंडूचा ताबा आमच्याकडे होता. विश्वचषक जिंकण्यासाठी त्यांना या गोष्टींची आवश्यकता असते. आगामी सामन्यातही आमचा याच कामगिरीचा प्रयत्न राहील,’’ असे प्रशिक्षक रीड म्हणाले.

इंग्लंडचा संघ जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे, मात्र दोन्ही संघांच्या कामगिरीत फारसा फरक नाही. गेल्या वर्षी दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध तीन सामने खेळले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन्ही संघांतील सामना ४-४ असा बरोबरीत राहिला. ‘एफआयएच’ प्रो लीगमधील पहिला सामना ३-३ असा बरोबरीत राहिला, तर  दुसऱ्या सामन्यात भारताने ४-३ असा विजय नोंदवला. इंग्लंडच्या बांडुराक व फिल रोपरने वेल्सविरुद्ध गोल केले.

’ वेळ : सायं. ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स फस्र्ट

अन्य सामना : ’ स्पेन वि. वेल्स (सायं ५ वा.)

Story img Loader