चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेतील पदकासह आत्मविश्वासाने ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेकडे जाण्याचा निर्धार भारतीय संघाने केला आहे. या स्पध्रेत शुक्रवारी भारताची गाठ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीशी पडणार आहे.
१९८२मध्ये अ‍ॅमस्टरडॅम येथे भारताने चॅम्पियन्स करंडक स्पध्रेतील एकमेव कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतरच्या सात स्पर्धामध्ये भारताला कांस्यपदकाने हुलकावणी दिली होती. मागील दोन स्पर्धामध्ये म्हणजे मेलबर्न (२०१२) आणि भुवनेश्वर (२०१४) या ठिकाणी भारतीय क्रीडारसिकांची निराशा झाली होती. आता आणखी एका पदकाची भर घालण्याच्या ईष्र्येने भारतीय संघाच्या अभियानाला ली व्हॅली हॉकी केंद्रात प्रारंभ होणार आहे.
‘‘चॅम्पियन्स करंडक स्पध्रेतील पदक हे वास्तववादी लक्ष्य आम्ही समोर ठेवले आहे. या स्पध्रेतील पदक ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेला जाताना आत्मविश्वास उंचावणारे ठरणार आहे,’’ असे प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी सराव सत्रानंतर सांगितले.
‘‘आम्हाला आव्हाने आवडतात. मात्र सामन्यातील स्थितीनुसार रणनीती राबवणे अधिक महत्त्वाचे आहे,’’ असे ओल्टमन्स यांनी सांगितले. सुलतान अझलन शाह चषक स्पध्रेत भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियापाठोपाठ रौप्यपदक पटकावले. काही उदयोन्मुख खेळाडूंनाही आजमावण्याचा ओल्टमन्स यांचा या स्पध्रेत प्रयत्न असेल. गोलरक्षक पी. आर. श्रीजेश चॅम्पियन्स करंडक स्पध्रेसाठी भारताचे नेतृत्व सांभाळत आहे. अझलन शाह स्पध्रेत न खेळणाऱ्या पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञ व्ही. आर. रघुनाथचे संघात पुनरागमन झाले आहे. तथापि, सरदार सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांना विश्रांती देण्यात आली आहे.

Untitled-18