India and Pakistan entered the semi-finals of Asian Games: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. १४ ऑक्टोबरला हे दोन संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. मात्र, त्याआधीही हे दोन्ही संघ भिडण्याची शक्यता आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हा संघर्ष पाहायला मिळत आहे.
वास्तविक, आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेपाळचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, त्याचबरोबर पाकिस्तानने हाँगकाँगचा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी तर पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारतीय संघ बांगलादेशच्या तुलनेत बलाढय़ आहे, तर अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तान संघ मजबूत आहे.
अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकून अंतिम फेरीत सहज प्रवेश करू शकतात, असे म्हणता येईल. असे झाल्यास १४ ऑक्टोबरपूर्वी क्रिकेट चाहत्यांना आणखी एक मोठा सामना पाहायला मिळू शकतो. भारतीय संघ ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६.३० वाजता उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. त्याच दिवशी सकाळी ११.३० वाजता पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचा अंतिम सामना ७ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजता होणार आहे.
हेही वाचा – Rankings Announced: आयसीसी क्रमवारीत मोठा बदल; सिराज आणि शुबमनचे नुकसान, तर बाबर आझमला झाला फायदा
यावेळी विश्वचषक २०२३ मध्ये सहभागी झालेल्या आशियाई संघांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या बी-टीम्सना मैदानात उतरवले आहे. कारण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषक स्पर्धेच्या तारखा एकमेकांशी भिडत होत्या. मात्र, भारताच्या या बी-टीममध्ये समाविष्ट असलेल्या जवळपास सर्वच खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे.
भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग.
हेही वाचा – Asian Games: भारताने भालाफेकमध्ये रचला इतिहास! नीरज चोप्राने सुवर्ण, तर किशोर जेनाने रौप्यपदकावर कोरले नाव
पाकिस्तान संघ: कासिम अक्रम (कर्णधार), ओमेर बिन युसूफ, आमिर जमाल, अराफत मिन्हास, अर्शद इक्बाल, आसिफ अली, हैदर अली, खुशदिल शाह, मिर्झा ताहिर बेग, मोहम्मद हसनैन, मुहम्मद अखलाक (यष्टीरक्षक), रोहेल नजीर, शाहनवाज दहनी, सुफियान मुकीम आणि उस्मान काझी.