मानसिक कणखरतेच्या बाबतीत सचिन अनेक आघाडय़ांवर खरा उतरला. अनेक कठीण प्रसंग सचिनच्या आयुष्यात आले. पण कधीही तो डगमगला नाही. सचिनचे वडिलांशी अगदी जवळचे संबंध होते. १९९९च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान वडिलांचे निधन झाले, त्यावेळी तो लंडनहून मायदेशी परतला. पण दोन दिवसांनी परत जाऊन त्याने पुढील दिवशी शतक झळकावले आणि वडिलांना समर्पित केले. फारच थोडय़ा लोकांना हे जमू शकते. सचिन हे मानसिक कणखरतेचे एव्हरेस्ट आहे, अशा शब्दांत क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सचिनशी सतत संपर्कात असणारे भीष्मराज बाम म्हणाले, ‘‘चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे सचिनला सतत जाणवायचे. कुणीही आपल्यावर टीका केली की मृदू स्वभावाचा सचिन घायाळ व्हायचा. जे मोठे असतात, त्यांच्यावर लोक सातत्याने टीका करतात. साध्या माणसाला सहन होणार नाही, अशी जहरी टीका सचिनवर झाली. पण सचिनचे लक्ष कधीही विचलित झाले नाही. मैदानावर जाताना तो सर्व काही विसरून फक्त आपली कामगिरी साकारायचा. प्रसारमाध्यमांनाही त्याने कधी कडवटपणा येऊ दिला नाही.’’
‘‘देशाचे प्रतिनिधित्व करणे, ही मोठी जबाबदारी असते. पंचांनी सचिनला बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने बाद ठरवले. याचा नक्कीच परिणाम सचिनवर होत होता. सचिनवर पंचांनी अन्यायच केला, असे मी म्हणेन. पण त्याने कधी एक चकार शब्दही काढला नाही. कोलकातात झालेल्या सामन्यात धाव पूर्ण केल्यानंतर शोएब अख्तर सचिनच्या अंगावर पडला. त्यावेळी सचिनची बॅट हवेत उचलली गेली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी अपील केले आणि पंचांनीही त्याला बाद ठरवले. सर्व लोकांना त्यावेळी वाईट वाटले होते. पण सचिन कोणतेही हावभाव न करता माघारी परतला. कोणत्याही खेळाडूला मदत करण्यासाठी सचिन सदैव अग्रेसर असायचाय अन्य खेळाडू आपल्या चिंतेत असताना संघातील उदयोन्मुख खेळाडूंना सचिनच मदत करायचा. जे मोठे असतात, ते फारच साधे असतात आणि हा साधेपणा सचिनमध्ये ठासून भरलेला आहे. सचिनसारखे फारच थोडे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात,’’ असेही बाम यांनी सांगितले.
‘‘सचिन रागावला आहे, हे कधीही त्याच्या बोलण्यातून, वागण्यातून जाणवले नाही. प्रत्येक बदलाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन निराळा होता. कोणतीही गोष्ट शाश्वत आहे, हे सचिनला मान्य नव्हते. निराश असतानाही तो कायम सकारात्मक असायचा. चांगल्या फॉर्ममध्ये असतानाही तो कृतज्ञ असायचा. पण खराब फॉर्ममध्ये तो कधीही डगमगून गेला नाही. त्याच्या चेहऱ्यावर कधीही नैराश्य दिसले नाही. तो पूर्णपणे एकाग्र असायचा. त्याचा स्वत:वर प्रचंड विश्वास होता. लहान मुले जशी स्वत:त गुंतलेली असतात. बाहेरच्या जगाचा त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडत नसतो. तशाचप्रकारची भिंत सचिनने निर्माण केली होती. म्हणूनच चाहत्यांचे अपेक्षांचे ओझे सचिनला कधीही जाणवले नाही. पण ‘नव्‍‌र्हस-९०’चा शिकार ठरल्यानंतर ही भिंत काहीशी डळमळीत व्हायची, म्हणूनच त्याच्यावर दडपण जाणवायचे,’’ असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे म्हणाले.
सचिनच्या मानसिक कणखरतेविषयी क्रीडा मानसतज्ज्ञ नीता ताटके म्हणाल्या, ‘‘अतिशय कणखर आणि सक्षम असे सचिनचे व्यक्तिमत्व आहे. त्याच्या आयुष्यात खूप वेळा चढ-उतार आले. पण प्रत्येक वेळा त्याने जोमाने पुनरागमन केले. यावरूनच तो किती एकाग्र आणि सक्षम आहे, याची प्रचिती येते. आपल्याला काय करायचे आहे, याचे स्पष्ट चित्र सचिनच्या डोळ्यासमोर असावे. म्हणूनच प्रत्येक आव्हानाला सचिनने धैर्याने तोंड दिले.’’   

Story img Loader