Mohammed Siraj saying meri English khatam ho gayi : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. तेव्हापासून या विश्वचषकाशी निगडीत अनेक रंजक किस्से समोर येत आहेत, ते ऐकून चाहत्यांचे निखळ मनोरंजन होत आहे. त्याचबरोबर चाहत्यांना आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल माहित नसलेल्या गोष्टी समजत आहेत. आता भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने एका टीव्ही शोवर टी-२० विश्वचषकाशी संबंधित मोहम्मद सिराजचा एक मजेशीर किस्सा शेअर केला, ज्याने चाहत्यांना हसू आले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकामध्ये फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता. यापूर्वी २००७ मध्ये भारताने या स्पर्धेचा पहिला हंगाम जिंकला होता. या विजयानंतर भारतीय खेळाडू मैदानावर खूप भावूक झाले पाहायला मिळाले. यावेळी अनेक खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या. टीम इंडियाचे बाकीचे खेळाडू त्या दिवशी मैदानावर विजयाचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल अडचणीत सापडले होते. ज्याचा खुलासा आता द ग्रेट इंडिया कपिल शो या कॉमेडी मालिकेत अक्षर पटेलने केला.
अक्षर पटेलने सांगितला सिराजचा मजेशीर किस्सा –
अक्षर पटेल सिराजबद्दल काय म्हणाला?
भारताच्या विजयानंतरही मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल का चिंताग्रस्त झाले होते? हे सिराजने आपल्या सहकाऱ्यांना सांगितले होते. याबाबत अक्षर पटेल शोमध्ये म्हणाला, ‘टी-२० विश्वचषक जिंकून भारतात आल्यावर सिराजने सर्वांना सांगितले की, अरे डीके भाईंनी माझी इंग्रजीत मुलाखत घेतली होती. बरेच लोक होते आणि प्रत्येकाला इंग्रजी येते. मला कळले नाही की फक्त आम्हा दोघांनाच इंग्रजीसाठी का पकडले?’ अक्षरचे हे वाक्य ऐकून प्रेक्षकांनाही हसू आवरले नाही.
हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिकने मोडला विराटचा खास विक्रम! भारतासाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
‘माझी जितकी इंग्रजी होती, ती संपली’ –
अक्षरसह भारतीय कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग आणि शिवम दुबेही या शोमध्ये उपस्थित होते. यानंतर कपिल शर्माने अक्षरला विचारले, ‘मग त्यानंतर तुम्ही इंग्रजीत मुलाखत दिलीत का?’ कपिलला उत्तर देताना अक्षर म्हणाला की, मोहम्मद सिराजने त्याची इंग्रजी संपली असं म्हणून अर्धी मुलाखत सोडून पळ काढला. अक्षर म्हणाला, ‘हो. दिली ना, मला पण माहित नाही मी काय बोललो. सिराज तर अर्धी मुलाखत सोडून पळून गेला. तो म्हणाला, माझी जितकी इंग्रजी होती, ती संपली.’