|| ऋषिकेश बामणे

माजी हॉकीपटू मर्विन फर्नाडिस यांचे मत

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला असला तरी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग किंवा कर्णधार मनप्रीत सिंग यांच्यावर आरोप-प्रत्यारोप करणे अयोग्य असून त्यांच्याकडून त्यांचे पद काढून घेण्याची आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी हॉकीपटू मर्विन फर्नाडिस यांनी व्यक्त केली.

तब्बल ४३ वर्षांनंतर भारताला पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची संधी होती, मात्र नेदरलँड्सने २-१ असा विजय मिळवत यजमानांचे मनसुबे उधळून लावले. याविषयी विचारले असता फर्नाडिस म्हणाले, ‘‘भारताने हॉकी विश्वचषक स्पर्धेत उत्तम खेळ केला. घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे साहजिकच त्यांच्याकडून जगज्जेतेपदाचीच अपेक्षा सर्व चाहत्यांना होती. मात्र नेदरलँड्सने अव्वल दर्जाचा खेळ केल्याने ते उपांत्य फेरीत जाण्यास नक्कीच पात्र आहेत.’’

‘‘या पराभवामुळे भारतीय संघात बदल करण्याची काही गरज नाही. एका प्रशिक्षकाला सर्वोत्तम संघ घडवण्यात जवळपास दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो. दोन स्पर्धामधील अपयशावरून तुम्ही प्रशिक्षकाच्या कामगिरीचा आढावा घेऊ शकत नाही; किंबहुना हरेंद्र सिंग हे भारताला लाभलेल्या सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहेत, असे मला वाटते. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्यांच्याविरुद्ध कोणतेही पाऊल उचलल्यास भारतीय हॉकीसाठी ते घातक ठरू शकते,’’ असे फर्नाडिस यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे मनप्रीतलादेखील आणखी काही काळ कर्णधारपदाचा अनुभव मिळाल्यास तो स्वत:सह संघाकडूनही सवरेत्कृष्ट कामगिरी करवून घेईल, याची मला खात्री वाटते, असेही फर्नाडिस म्हणाले. याव्यतिरिक्त, यंदा ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात अंतिम फेरी होईल व त्यात ऑस्ट्रेलिया बाजी मारेल, असे वाटत असल्याचे फर्नाडिस यांनी नमूद केले.

पंचांसंबंधी प्रश्नाला बगल

भारताला नेदरलँड्सविरुद्ध पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे पराभव पत्करावा लागला, असे हरेंद्र सिंग यांनी गुरुवारी पराभवानंतर सांगितले होते. मात्र फर्नाडीस यांनी या प्रश्नावर मौन बाळगले. ते म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष सामन्यात काय घडले आपण सर्वानीच पाहिले. त्यामुळे पंचांनी चुकीचे निर्णय घेतले की नाही, याविषयी मी माझे मत मांडून काहीच फायदा नाही. त्यामुळे या प्रश्नाला मी क्रिकेटमध्ये डेड (बॉल) चेंडू असल्याप्रमाणे महत्त्व देत नाही.’’

तिकिटविक्रीला थंड प्रतिसाद

भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे शुक्रवारी कलिंगा स्टेडियमबाहेरील तिकीट खिडकीवर कमी गर्दी पाहण्यास मिळाली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यासाठी अवघ्या ३,००० तिकिटांची विक्री झाली असून सामन्याच्या एक तास अगोदपर्यंत आम्ही तिकिटविक्री चालू ठेवणार आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. १५,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये गुरुवारी झालेल्या भारत-नेदरलँड्स यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याची तिकिटे बुधवारीच विकली गेली होती.

Story img Loader