ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणारी महिला बॉक्सर एम. सी. मेरी कोम या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धेला मुकणार आहे. राष्ट्रीय स्पर्धामध्ये नवीन खेळाडूंना संधी मिळावी, तसेच नवे विजेते घडावेत, यासाठी मेरी कोम या स्पर्धेत खेळणार नाही.
आग्रा येथे २००८मध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मेरी कोमने प्रतिनिधित्व केले होते. त्या वेळी तिने ४६ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती, पण त्यानंतर मेरी कोमला एकाही राष्ट्रीय स्पर्धेत खेळता आलेले नाही. जुळ्या मुलांना जन्म दिल्याने ती २००९ आणि २०१०मध्ये खेळू शकली नव्हती. ‘‘अनेक प्रतिभावान महिला खेळाडू पुढे याव्यात, यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत न खेळण्याचे मी ठरवले आहे,’’ असे पाच वेळा जगज्जेत्या ठरलेल्या मेरी कोम हिने सांगितले. नववी राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धा रविवारपासून गुवाहाटी येथे सुरू होणार आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये ५१ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवणाऱ्या मेरी कोमने २०१६ रिओ डी जानेरो ऑलिम्पिककडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. ‘‘२०१६च्या ऑलिम्पिकमध्ये ४८ किलो वजनी गटाचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ उत्सुक असल्याचे माझ्या कानावर आले आहे. तसे झाल्यास, मला ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी सोपे जाणार आहे,’’ असे मणिपूरची बॉक्सर मेरी कोम म्हणाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा