वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैगिंक शोषणाच्या आरोपांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करणे व त्यांच्या अटकेची मागणी करताना जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना क्रीडाविश्वातून पाठिंबा मिळू लागला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि माजी नेमबाज अभिनव बिंद्रा या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांसह अन्य काही नामांकित खेळाडूंनी समाजमाध्यमांवर संदेश लिहून आंदोलनकर्त्यां कुस्तीगिरांचे समर्थन केले.

‘‘आपल्या खेळाडूंना न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते हे पाहून दु:ख होते. या खेळाडूंनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि देशाचे नाव उंचावले आहे. राष्ट्र म्हणून, प्रत्येक व्यक्ती, मग खेळाडू असो वा नसो, त्याच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. आता जे घडत आहे, ते कधीही घडायला नको. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो नि:पक्षपाती व पारदर्शक पद्धतीने हाताळला गेला पाहिजे. न्याय मिळावा यासाठी संबंधित प्रशासनाने त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे,’’ असे नीरजने ‘ट्वीट’ केले.

‘‘आम्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप मेहनत घेतो. भारतीय कुस्ती महासंघाशी संबंधित व्यक्तीवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी खेळाडूंना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागते, हे चिंताजनक आहे,’’असे ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता बिंद्रा म्हणाला.

तसेच भारताची सर्वात यशस्वी टेनिसपटू सानिया मिर्झानेही कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला. ‘‘एक खेळाडू म्हणून आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे एक महिला म्हणून सध्या जे घडत आहे, ते पाहून दु:ख होते. या खेळाडूंनी देशाचे नाव उंचावले आहे. त्यांचे यश आपण साजरे केले आहे. आता या कठीण काळातही आपण त्यांच्यासोबत राहणे गरजेचे आहे. हा एक संवेदनशील मुद्दा आहे,’’असे टेनिसपटू सानियाने ‘ट्वीट’ केले.

क्रिकेटपटूंचाही पाठिंबा

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. परंतु क्रिकेटपटू या प्रकरणावर भाष्य का करत नाहीत, असा प्रश्न विनेश फोगटने गुरुवारी उपस्थित केला होता. शुक्रवारी माजी कर्णधार कपिल देव, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला. ‘‘साक्षी आणि विनेश यांच्याबद्दल देशाला गर्व आहे. त्यांना न्यायासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागते हे पाहून दु:ख होते. त्यांना न्याय मिळेल अशी प्रार्थना करतो,’’ असे हरभजन म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Messages from neeraj chopra abhinav bindra and other athletes on social media in support of wrestlers amy
Show comments