लिओनेल मेस्सीने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेच्या नव्या हंगामाची दणक्यात सुरुवात केली. अ‍ॅथलेटिक बिलबाओचा ५-१ ने धुव्वा उडवत बार्सिलोनाने कट्टर प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदवर गुणतालिकेत १४ गुणांची आघाडी घेतली आहे.
गेरार्ड पिक्यूने २३व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाचे खाते उघडले. यानंतर अवघ्या दोन मिनिटांत मेस्सीने फर्नाडो अमोरबिइटाकडून मिळालेल्या पासचा उपयोग करत गोल झळकावला. मध्यंतराला काही मिनिटे असताना अ‍ॅड्रियनो कोरइआ याने गोल करत बार्सिलोनाची आघाडी बळकट केली. विश्रांतीनंतरही बिलबाओला बार्सिलोनाच्या आक्रमणाला रोखण्यात अपयश आले. सेक फॅब्रेगासने गोल केला. ६६व्या मिनिटाला बिलबाओतर्फे इबाई गोमेझने एकमेव गोल केला. ७०व्या मिनिटाला मेस्सीने आणखी गोल झळकावत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
 कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमापासून मेस्सी एक गोल दूर आहे. जर्मनी आणि बायर्न म्युनिच यांच्यासाठी खेळताना गेरार्ड म्युलरने ८५ गोल करण्याची किमया केली होती.
मँचेस्टर युनायटेडचा निसटता विजय
लंडन : रॉबिन व्हॅन पर्सीने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत रीडिंगवर निसटता विजय मिळवला. अ‍ॅलेक्स फग्र्युसनच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर युनायटेडने गुणतालिकेत पारंपरिक प्रतिस्पर्धी मँचेस्टर सिटीला मागे टाकत आगेकूच केली आहे. वेन रुनीने २ तर रॉबिन व्हॅन पर्सी आणि एँडरसनने प्रत्येकी एक गोल केला. रीडिंगतर्फे हाल रॉबसन-कानूने एकमेव गोल केला.
विजयासह बेकहॅमचा लाए गॅलेक्सीला अलविदा
कार्सन : लाए गॅलेक्सीच्या जेतेपदासह प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने लाए गॅलेक्सी संघाला अलविदा केला. हौस्टन डायनॅमोवर ३-१ ने विजय मिळवत लाए गॅलेक्सीने जेतेपद कायम राखले.

Story img Loader