गेल्या वर्षीची निराशाजनक कामगिरी आणि फिफा विश्वचषक उंचावण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न या सर्व गोष्टी बाजूला सारत लिओनेल मेस्सीने नव्या मोसमाची शानदार सुरुवात केली. त्याने केलेल्या दोन गोलमुळे बार्सिलोनाने ला लीगा फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. एल्चेवर ३-० अशी मात करत नवनियुक्त प्रशिक्षक लुइस एन्रिके यांनीही आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली.
भन्नाट वेग आणि ड्रिब्लिंगचे अफलातून कौशल्य यामुळे मेस्सीने घरच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात चाहत्यांची मने जिंकली. ४१व्या मिनिटाला मेस्सीने खाते खोलल्यानंतर बार्सिलोनाला जेवियर मॅस्चेरानोला गमवावे लागले. एल्चेच्या गॅरी रॉड्रिगेझला धक्का मारल्याप्रकरणी मॅस्चेरानोला रेफ्रींनी लाल कार्ड दाखवले. पण दुखापतग्रस्त नेयमारच्या जागी संधी मिळालेल्या १८ वर्षीय मुनीर ईल हद्दादी याने पहिल्या सत्राचा खेळ संपण्याआधी दुसरा गोल लगावला. ६३व्या मिनिटाला मेस्सीने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत एल्चेच्या बचावपटूंची भिंत भेदली. त्यानंतर चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवत बार्सिलोनाच्या विजयावर मोहोर उमटवली.
दरम्यान, इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये मँचेस्टर युनायटेडला मात्र संडरलँडविरुद्ध १-१ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. पहिल्या सामन्यात पराभव आणि दुसऱ्या सामन्यात बरोबरी यामुळे प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांचे मँचेस्टर युनायटेड संघातील पदार्पण निराशाजनक झाल्याची चर्चा आहे. जुआन माटाने १७व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडसाठी गोल केल्यानंतर जॅक रॉडवेलने ३०व्या मिनिटाला संडरलँडला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

Story img Loader