लिओनेल मेस्सीच्या या मोसमातील पहिल्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने व्हॅलेन्सियाचा ३-२ असा पराभव करून स्पॅनिश लीग (ला लीगा) फुटबॉल स्पर्धेत पहिले तिन्ही सामने जिंकून शानदार सुरुवात केली. रिअल माद्रिदनेही सलग तीन विजयांची नोंद केली आहे.
सुपर चषकातील बार्सिलोनाच्या अॅटलेटिको माद्रिदवरील विजयात मेस्सी काहीसा चाचपडत होता. पण रविवारी झालेल्या सामन्यात मेस्सीचा पूर्वीसारखा खेळ पाहायला मिळाला. त्याने सुरुवातीलाच केलेल्या दोन गोलमुळे ३९व्या मिनिटाला बार्सिलोनाने २-० अशी आघाडी घेतली होती. ४१व्या मिनिटाला नेयमारने दिलेल्या पासवर मेस्सीने गोल करत हॅट्ट्रिक साजरी केली. पहिल्या सत्राच्या अखेरीस व्हॅलेन्सियाने सुरेख पुनरागमन केले. दोन मिनिटांच्या अंतराने हेल्डर पोस्टिगाने दोन गोल करत व्हॅलेन्सियाला सामन्यात पुनरागमन करून दिले. दुसऱ्या सत्रात यजमान व्हॅलेन्सियाने आक्रमक खेळ करत बार्सिलोनावर दडपण आणले. मात्र सामन्यात बरोबरी साधण्यात त्यांना अपयश आले.
‘‘व्हॅलेन्सियाच्या घरच्या मैदानावरील वातावरण थक्क करणारे असते. त्यामुळे येथे सरस कामगिरी साकारणे कठीण असते. पहिल्या ४४ मिनिटांच्या खेळावर आम्ही वर्चस्व गाजवले. त्यावेळी आम्ही -० अशा आघाडीवर होतो. पण त्यानंतर व्हॅलेन्सियाने दोन गोल केल्यामुळे आम्हाला अडचणीत आणले. ही मोसमाची सुरुवात असल्यामुळे आम्ही कामगिरीत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करू,’’ असे बार्सिलोनाचा अव्वल खेळाडू आंद्रेस इनियेस्टा याने सांगितले.
१०व्या मिनिटाला नेयमारने सेस्क फॅब्रेगसच्या पासवर केलेला गोल पंचांनी ऑफसाइड ठरवला. त्यानंतर लगेचच मेस्सीने आदिल रामी आणि दिएगो अल्वेस या व्हॅलेन्सियाच्या बचावपटूंना चकवत पहिला गोल झळकावला. ३९व्या आणि ४१व्या मिनिटाला त्याने आणखी दोन गोलांची भर घालत हॅट्ट्रिक साजरी केली.
स्पॅनिश लीग फुटबॉल : मेस्सीची हॅट्ट्रिक; बार्सिलोना अव्वल स्थानी
लिओनेल मेस्सीच्या या मोसमातील पहिल्या हॅट्ट्रिकमुळे बार्सिलोनाने व्हॅलेन्सियाचा ३-२ असा पराभव करून स्पॅनिश लीग (ला लीगा) फुटबॉल स्पर्धेत पहिले तिन्ही सामने जिंकून शानदार सुरुवात केली.
First published on: 03-09-2013 at 04:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Messi fires first half hat trick as barca beat valencia