संयमी.. शांत.. सामन्यात कधी चिडचिड न करणारा लिओनेल मेस्सी जेव्हा चिडतो तेव्हा तो काय करू शकतो, याची प्रचीती बुधवारी मध्यरात्री रोम संघाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत फुटबॉल चाहत्यांना आली. त्यामुळे या लढतीतील बार्सिलोनाच्या ३-० अशा विजयापेक्षा मेस्सीच्या वादग्रस्त भांडणाचीच चर्चा जास्त झाली.
२६व्या मिनिटाला नेयमारने गोल करून बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, अवघ्या आठच मिनिटांच्या आत रोम संघाचा बचावपटू मापोउ यांगा-बिवा आणि मेस्सी यांच्यात बाचाबाची झाली. यांगा-बिवाने त्याचे डोके मेस्सीच्या दिशेने सरकवले आणि मेस्सीने त्याला डोक्याने जोरात धडक दिली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक द्वंद्वही रंगले. हे प्रकरण अधिक गंभीर होण्याआधीच खेळाडूंनी तेथे धाव घेत दोघांना दूर केले. या घटनेनंतर दोघांना लाल कार्ड दाखविणे अपेक्षित असताना पंचांनी पिवळे कार्ड दाखवून केवळ ताकीद दिली. आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत मेस्सीला २००५ साली एकदाच लाल कार्ड मिळाले आहे.
या वादानंतर ४१व्या मिनिटाला मेस्सीने गोल करून ही आघाडी दुप्पट केली.
मध्यंतरानंतरही बार्सिलोनाने सामन्यावरील पकड मजबूत केली. ६६व्या मिनिटाला इव्हान रॅकिटीकने केलेल्या गोलने बार्सिलोनाला ३-० असे निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले. हे वर्चस्व अखेपर्यंत कायम राखत बार्सिलोनाने विजय पक्का केला.

Story img Loader