स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने केलेल्या चार गोलांच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत ओसासूना संघाचा ५-१ असा सहज पराभव केला. त्याचबरोबर स्पॅनिश लीगमध्ये सलग ११ सामन्यांत गोल झळकावण्याची किमया करत मेस्सीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
बार्सिलोनातर्फे प्रेडो रॉड्रिग्जने पाचव्या गोलाची भर घातली, तर ओसासूनातर्फे राऊल लो याने एकमेव गोल केला. दोन वेळा चेंडू हातावर आदळल्यामुळे अलेजांड्रो अरिबास याला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे एक तासापेक्षा जास्त वेळ ओसासूनाला १० जणांसह खेळावे लागले.
या विजयासह बार्सिलोनाने ५८ गुणांसह पारंपरिक प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदला १५ गुणांनी मागे टाकून अव्वल स्थान कायम राखले आहे. अ‍ॅटलेटिको माद्रिद ४७ गुणांसह दुसऱ्या, तर रिअल माद्रिद ४३ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. मेस्सीने या मोसमात तब्बल ३३ गोल झळकावले आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या हॅट्ट्रिकमुळे रिअल माद्रिदने गेटाफेचा ४-० असा सहज पराभव केला. या कामगिरीनंतरही रोनाल्डोच्या नावावर २५ गोल जमा आहेत. दुखापतीमुळे दोन महिन्यांनंतर डेव्हिड व्हिलाने बार्सिलोना संघात पुनरागमन केले. ११व्या मिनिटाला झावी हेर्नाडेझच्या पासवर मेस्सीने पहिल्या गोलची नोंद केली. त्यानंतर २४व्या मिनिटाला राऊलच्या गोलमुळे ओसासूनाने १-१ अशी बरोबरी साधली. पण पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करत मेस्सीने २८व्या, ५६व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. प्रेडोने ४१व्या मिनिटाला गोलाची भर घातली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा