दुखापतग्रस्त लिओनेल मेस्सी लवकरच पूर्णपणे बरा होऊन मैदानावर उतरेल, असा विश्वास बार्सिलोना संघाने व्यक्त केला आहे. कारण मेस्सीच्या दुखापतीबाबत कोणताही धोका पत्करण्यास ते तयार नाहीत. त्यामुळेच ला लीगा स्पध्रेत रविवारी सेल्टा विगो संघाविरुद्धच्या लढतीत मेस्सीला विश्रांती देण्याचा निर्णय बार्सिलोनाने घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय मत्रीपूर्ण लढतीत अर्जेटिना संघानेही मेस्सीला केवळ प्रेक्षक म्हणून संघात सहभागी करून घेतले होते. साल्वाडोर आणि एक्वेडोर संघांविरुद्ध मेस्सी पूर्णवेळ मैदानाबाहेर बसला होता. मेस्सीच्या पायाला दुखापत झाली आहे आणि पुरेशा विश्रांतीनंतर तो पूर्णपणे बरा होईल, असा विश्वास बार्सिलोना संघाला आहे. राष्ट्रीय संघाच्या सामन्यानंतर मेस्सी पुन्हा बार्सिलोनाच्या सराव शिबिरात सहभागी झाला. थोडा वेळ सराव करून त्याने पुन्हा विश्रांती घेणे पसंत केले.
लवकरच बरा होईन -मेस्सी
आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण लढतीत प्रेक्षकाची भूमिका पार पाडल्यानंतर लिओनेल मेस्सी बार्सिलोनात परतला. ‘‘आपला घोटय़ात अजूनही तीव्र वेदना होत असून तो सुजला आहे,’’ असे मेस्सीने सांगितले. अधिकृत ‘फेसबुक’ अकाऊंटवर मेस्सीने लिहिले की, ‘‘ राष्ट्रीय संघासोबतचा अमेरिका दौरा आंबट-गोड होता. आम्ही दोन विजय मिळवले. पाय सुजल्याने खेळता आले नाही. अजूनही वेदना होत आहे, परंतु लवकरच बरा होईन अशी आशा आहे.’’

Story img Loader