बार्सिलोनाच्या विजयात सुआरेजची चमक * मेस्सीला दुखापतीमुळे ७-८ आठवडे विश्रांती
गत विजेत्या बार्सिलोनाने शनिवारी मध्यरात्री झालेल्या ला लीगा स्पध्रेतील लढतीत लास पालमॅस संघावर २-१ असा विजय साजरा करून गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. मात्र, त्यांच्या या विजयाच्या आनंदावर लिओनेल मेस्सीच्या दुखापतीने दु:खाची झालर चढवली. पहिल्या सत्रातच गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी मेस्सीला मैदान सोडावे लागले. मेस्सीची ही दुखापत इतकी गंभीर आहे की, त्याला पुढील ७-८ आठवडे विश्रांती घ्यावी लागणार असल्याची माहिती बार्सिलोनाच्या प्रवक्त्यांनी दिली. त्यामुळे गड आला, पण सिंह गेला, अशी बार्सिलोनाची अवस्था झाली आहे. आपले जेतेपद राखण्यासाठी त्यांना पुढील काही लढतीत मेस्सीशिवाय संघर्ष करावा लागणार आहे.
बार्सिलोना आणि लास पालमॅस यांच्यातील या लढतीत बार्सिलोनाचा विजय हा निश्चितच होता. त्याची प्रचिती सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून आली. मेस्सीने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलजाळीनजीक जाऊन आक्रमण केले. चौथ्या मिनिटाला अशाच प्रयत्नात असताना झावी वरास याने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. वरासचा पाच मेस्सीच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागल्याने मेस्सी मैदानावर कोसळला आणि त्यामुळे स्तब्ध शांतता पसरली. प्रथमोपचारानंतर मेस्सी उभा राहिला खरा, परंतु दुखापतीच्या वेदना इतक्या तीव्र होत्या की, त्याला १०व्या मिनिटाला मैदानाबाहेर जाणे भाग पडले. त्याला बदली खेळाडू म्हणून मुनीर एल हदादी याला मैदानावर उतरवले. मेस्सीविना खेळताना बार्सिलोनावर काहीसे दडपण जाणवत होते, परंतु लुईस सुआरेजने सामन्याची सुत्रे आपल्या हाती घेत २५व्या मिनिटाला बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
सेर्गी रॉबटरेच्या पासवर सुआरेजने गोल केला. मध्यंतरापर्यंत बार्सिलोनाला याच आघाडीवर समाधान मानावे लागले. दुसऱ्या सत्रात ५४व्या मिनिटाला सुआरेजने हदादीच्या पासवर दुसरा गोल करून आघाडीत भर टाकली. ६६व्या मिनिटाला ही आघाडी वाढवण्याची संधी नेयमारला पेनल्टीच्या रूपात मिळाली होती, परंतु त्याने ती दवडली. लास पालमॅसकडून ८८व्या मिनिटाला जॉनथन विएराने एकमेव गोल केला.
इतर निकाल
रिआल माद्रिद ० बरोबरी वि. मॅलगा ०
व्हॅलेंसिआ १ (एस.मुस्ताफी २६ मि.) विजयी वि. ग्रॅनडा
गड आला, पण, सिंह गेला!
बार्सिलोना आणि लास पालमॅस यांच्यातील या लढतीत बार्सिलोनाचा विजय हा निश्चितच होता.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
First published on: 28-09-2015 at 05:59 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Messi injury mars barcelonas victory