लिओनेल मेस्सी आणि बार्सिलोना यांचे नाते अतूट आहे. या दोनपैकी एकाचा उल्लेख केल्यावर दुसऱ्याचा उल्लेख स्वाभाविकपणे येतो. मात्र समाजमाध्यमांमध्ये अचानकच मेस्सी बार्सिलोना सोडणार, अशा वावडय़ा पसरल्या होत्या. मात्र या वावडय़ांना बाजूला सारत मेस्सीने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाला अॅटलेटिको माद्रिदला ३-१असा शानदार विजय मिळवून दिला.
मेस्सीने या सामन्यात एक गोल करत नेयमार तसेच सुआरेझच्या गोलसाठी पायाभरणी करून दिली. मेस्सीच्या सर्वागीण प्रदर्शनाच्या बळावरच बार्सिलोनाने अॅटलेटिकोवर ३-१ असा विजय मिळवला. अॅटलेटिकोविरुद्धच्या सहा लढतीत बार्सिलोनाला विजयविरहित राहावे लागले होते. मेस्सीने दिलेल्या पासवर नेयमारने १२व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाचे खाते उघडले. सातत्याने चेंडूवर नियंत्रण राखत बार्सिलोनाने वर्चस्व गाजवले. ३५व्या मिनिटाला पुन्हा एकदा मेस्सीने आपली किमया दाखवत सुआरेझला सुरेख पास दिला. या पासचा अचूक उपयोग करून घेत सुआरेझने बार्सिलोनाची आघाडी बळकट केली.
सहकाऱ्यांसाठी चेंडू उपलब्ध करून देणाऱ्या मेस्सीच्या हातून झालेल्या चुकीमुळे अॅटलेटिकोच्या मारिओ मंडझुकिकला गोल करण्याची संधी मिळाली. मारिओच्या गोलमुळे अॅटलेटिकोची सलामी झाली. मात्र आक्रमण आणि बचाव या दोन्ही आघाडय़ांवर कमकुवत खेळामुळे सामना संपायला काही मिनिटे असताना मेस्सीने स्वत:च गोल करत बार्सिलोनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
युवा खेळाडूंच्या खरेदी विक्रीदरम्यान ‘फिफा’च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्सिलोनाचे अपील फेटाळले गेले. यामुळे एका वर्षांसाठी त्यांच्या युवा खेळाडूंच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. भरीस भर म्हणून क्लबच्या क्रीडा संचालकांना डच्चू देण्यात आला. या दरम्यान मेस्सी बार्सिलोना क्लब सोडणार, अशा चर्चाना उधाण आले आहे. या सर्व परिस्थितीत बार्सिलोनाचा विजय त्यांच्या चाहत्यांना सुखावणार आहे.
या विजयासह बार्सिलोनाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. रिअल माद्रिद अव्वल स्थानी कायम आहे तर पराभवानंतरही अॅटलेटिको तिसऱ्या स्थानी स्थिर आहे.
अन्य लढतीत ग्रॅनडा आणि रिअल सोसिदाद यांच्यातील लढत बरोबरीत सुटली. सेव्हिलाने अल्मेरिआवर २-० मात केली.
बार्सिलोना सोडण्याच्या अफवाच-मेस्सी
बार्सिलोना क्लब सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही. चेल्सी किंवा मँचेस्टर सिटी अशा कोणत्याही क्लबशी मी संलग्न नाही. अशा अफवांचा मला आता कंटाळा आला आहे. प्रशिक्षकांना डच्चू देण्याच्या बातमीतही काही तथ्य नाही. कोणाला काढायचे किंवा कायम ठेवायचे, हा निर्णय मी घेत नाही.