ला लिगा स्पर्धेत गतविजेत्या बार्सिलोना संघाने झंझावाती फॉर्म कायम राखला. नवख्या अल्मेरियावर २-० अशी मात करत यंदाच्या हंगामात आतापर्यंत झालेल्या सातही लढतीत विजय मिळवण्याचा पराक्रम बार्सिलोनाने केला. जागतिक सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मानकरी ठरलेल्या मेस्सीने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे बलाढय़ रिअल माद्रिदला अ‍ॅटलेटिको माद्रिदने पराभवाचा धक्का दिला.
२१व्या मिनिटाला मेस्सीने सुरेख गोल करत बार्सिलोनाचे खाते उघडले. मेस्सीचा फॉर्म पाहता बार्सिलोनाला तो आणखी काही गोल करून देईल असे चित्र होते. मात्र उजव्या मांडीचे स्नायू दुखावल्याने मेस्सीला मैदाने सोडावे लागले. मेस्सीच्या अनुपस्थितीचा फटका बार्सिलोनाच्या आक्रमणाला बसला. मध्यंतरानंतर अ‍ॅड्रियनोने ५६व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाची आघाडी भक्कम केली. वारंवार प्रयत्न करूनही अल्मेरियाला बार्सिलोनाचा बचाव भेदता आला नाही आणि बार्सिलोनाने २-० फरकासह हा सामना जिंकला. या विजयासह बार्सिलोना २१ गुणांसह अव्वल स्थानी आहे.
अ‍ॅटलेटिकोने २३ सामन्यांतला पराभवाचा दुष्काळ संपवत रिअल माद्रिदवर १-० अशी मात करत सनसनाटी विजयाची नोंद केली. ला लिगा स्पर्धेत सातत्याच्या अभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या अ‍ॅटलेटिकोने रिअलचे वर्चस्व हाणून पाडत हा विजय नोंदवला. दिएगो कॉस्टाने ११व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल अ‍ॅटलेटिकोच्या विजयाचा शिल्पकार ठरला. ख्रिस्तियानो रोनाल्डो, जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू गॅरेथ बॅले हे दोघेही गोल करण्यात अपयशी ठरले.
अन्य लढतींमध्ये व्हॅलेनसिआने रायो व्ॉलकानोवर १-० अशी मात केली. आघाडीपटू जोनासच्या एकमेव गोलच्या जोरावर व्हॅलेनसिआने हा विजय मिळवला. रिअल सोसिदाद आणि सेव्हिला यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. सेव्हिलातर्फे १८व्या मिनिटाला जैरोने तर ६६व्या मिनिटाला अँटोनिओ ग्रिझमनने गोल केला.  
अर्सेनेलची आगेकूच, चेल्सीची टॉटनहॅमशी बरोबरी
सर्जी नाबरी आणि आरोन रॅमसे यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर अर्सेनेलने इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत स्वान्सीवर २-१ अशी मात केली. दुसऱ्या लढतीत चेल्सी आणि टॉटनहॅम यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत सुटली. टॉटनहॅमच्या ग्यालफी सिग्युर्डसॉनने पहिला गोल केला. चुरशीच्या दुसऱ्या सत्रात जॉन टेरीने चेल्सीतर्फे गोल करत बरोबरी केली. यानंतर गोलसाठी दोन्ही संघांत जोरदार मुकाबला रंगला, मात्र बरोबरीची कोंडी सुटू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा