फुटबॉल जगतातील महान खेळाडू अशी ओळख निर्माण केलेल्या लिओनेल मेस्सीला आपल्या संघात विकत घेण्यासाठी कोणताही क्लब तयार होईल. पण बार्सिलोनाने मेस्सीसारखा स्टार फुटबॉलपटू आपल्याकडेच राखला आहे. मेस्सीने बार्सिलोनासोबतच्या नव्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून तो २०१८पर्यंत बार्सिलोनाची जर्सी घालून खेळणार आहे.
मेस्सीसह कार्लोस प्युयोल आणि झावी हेर्नाडेझ यांचे नव्याने करार करण्यात येतील, असे संकेत बार्सिलोनाने डिसेंबरमध्येच दिले होते. चार वेळा सर्वोत्तम जागतिक फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीने अखेर नव्या करारावर स्वाक्षरी करून आपण बार्सिलोनाकडेच असल्याचे दाखवून दिले.
प्युयोल आणि झावी यांनी शुक्रवारी दुपारी नव्या कराराला हिरवा कंदील दाखवला, तर मेस्सीने ३० जून २०१८पर्यंत आपला करार पुढे वाढवला. यावेळी मेस्सीसह त्याचे वडील उपस्थित होते. बार्सिलोनाच्या कार्यालयात झालेल्या या महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी क्लबचे अध्यक्ष सांड्रो रोसेल, उपाध्यक्ष जोसेप मारिया बाटरेमेऊ आणि क्रीडा संचालक अँडोनी झुबीझारेट्टा हे उपस्थित होते. पूर्वीच्याच कराराप्रमाणे ३३५ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम मेस्सीला मिळणार आहे. गेल्या आठ मोसमात मेस्सीने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत आघाडीवर असणाऱ्या बार्सिलोनाशी तब्बल सहा वेळा नवा करार केला आहे.
बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करताना २०१२ मध्ये सर्वाधिक ९१ गोल झळकावत मेस्सीने एका मोसमात सर्वाधिक गोल करण्याचा जर्मनीच्या गेर्ड म्युलर यांचा ८५ गोलांचा (१९७२) विक्रम मागे टाकला. त्याचबरोबर या मोसमात मेस्सीने आठ सामन्यांत १० गोल करून बार्सिलोनाला नऊ गुणांच्या फरकाने अव्वल स्थानावर आणले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा