गोल करण्याच्या अद्भुत कौशल्याने बार्सिलोना आणि अर्जेटिनाला विजयपथावर नेणाऱ्या लिओनेल मेस्सीने सलग चौथ्यांदा बलून डी ओर पुरस्कारावर नाव कोरले. वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूला हा पुरस्कार देण्यात येतो. बार्सिलोना संघातील सहकारी आंद्रेस इनेस्टा तसेच रिअल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो या मातब्बर खेळाडूंना मागे टाकत मेस्सीने हा पुरस्कार पटकावला.
आधुनिक काळातला सवरेत्कृष्ट फुटबॉलपटू अशी मेस्सीची प्रतिमा तयार झाली आहे. सलग चौथ्या पुरस्काराने मेस्सीबद्दलच्या या प्रतिमेवरही शिक्कामोर्तब झाले आहे.
मेस्सीने या पुरस्कारासाठी ४१.६० टक्के मते जिंकली. मेस्सीच्या तुलनेत रोनाल्डोला २३.६८ टक्के तर इनिएस्टाला १०.९१ टक्के मते मिळाली. नेदरलँण्ड्सच्या जोहान क्रुयफ आणि मार्को व्ॉन बॅस्टेन या दोन महान खेळाडूंनी तीनदा या पुरस्कारावर नाव कोरले होते. युएफाचे अध्यक्ष मिचेल प्लॅटिनी यांनी सलग तीन वेळा हा पुरस्कार पटकावला होता. मात्र सलग चौथ्यांदा या पुरस्काराचा मानकरी होत मेस्सीने सर्व विक्रम मोडले आहेत. दरम्यान स्पेनच्या विसेन्टी डेल बॉस्क्यू यांची सवरेत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून निवड झाली.
२०१२ वर्षांत ९१ गोल झळकावत मेस्सीने वर्षांत सर्वाधिक गोल करण्याचा गर्ड म्युलर यांचा विक्रम मोडला होता. ला लिगा स्पर्धेत मेस्सी सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत २५ गोलांसह अग्रस्थानी आहे. मात्र वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाचा विजय महत्त्वाचे असल्याचे मेस्सीने सांगितले.
दरम्यान या पुरस्काराचा खरा मानकरी रोनाल्डो असल्याची चर्चा रंगली होती. रोनाल्डोच्या ४६ गोलमुळेच रिअल माद्रिदने बार्सिलोनाची जेतेपदावरची सद्दी संपवली होती. संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यामुळे रोनाल्डो पुरस्कारासाठी शर्यतीत होता. मात्र मेस्सीच्या सातत्याने गोल झळकावण्याच्या किमयेमुळे मतदात्यांनी त्याची निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे. बार्सिलोनासाठी ५० गोल तसेच आठ हॅट्ट्रिकमुळे मेस्सीचे पारडे जड झाले.
मेस्सी केवळ बार्सिलोनासाठीच खेळतो हा समजही मेस्सीने यंदा खोडून काढला. अर्जेटिनासाठी १२ गोल झळकावत मेस्सीने आपले देशप्रेमही सिद्ध केले.
मला हा पुरस्कार माझ्या बार्सिलोनाच्या सहकाऱ्यांसमेवत विशेषत: आंद्रेस इनिएस्टासोबत शेअर करायला आवडेल असे मेस्सीने सांगितले. त्या सगळ्यांसोबत मी रोज सराव करतो याचा मला अभिमान आहे. अर्जेटिना संघातील माझे सहकारीही या पुरस्काराचे मानकरी आहेत. मला मत देणारे कर्णधार, प्रशिक्षक यांचे मनापासून आभार. माझे कुटुंबीय, मित्रपरिवार यांचा या पुरस्कारात मोठा वाटा असल्याचे मेस्सीने सांगितले.
एखाद्या लहान मुलाला जशी खेळाची, गोल करण्याची आवड असते तशा पद्धतीने मेस्सी आजही खेळतो आणि हेच त्याचे वैशिष्टय़ असल्याचे उद्गार बार्सिलोनाचे प्रशिक्षक टिटो व्हिलानोव्हा यांनी काढले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा