एका कॅलेंडर वर्षांत सर्वाधिक गोल करण्याचा पेले यांचा विक्रम लिओनेल मेस्सी याने मागे टाकला. याशिवाय त्याने २०१२मध्ये ७६ गोल झळकावण्याची किमया साधली आहे. मेस्सीच्या दोन गोलांच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत मलोर्कावर ४-२ असा विजय संपादन केला.
झावी हेर्नाडेझने मलोर्काचा बचाव भेदून २८व्या मिनिटाला फ्री-किकवर गोल केला. त्यानंतर ४४व्या मिनिटाला मेस्सीने गोल करत बार्सिलोनाची आघाडी २-० अशी वाढवली. ख्रिस्तियान मेलोने पहिले सत्र संपायला काही सेकंद शिल्लक असताना तिसरा गोल झळकावून बार्सिलोनाला विजयपथावर आणले. मात्र दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मलोर्काने दोन गोल झळकावत सामन्यात रंगत आणली. मात्र मेस्सीने ७०व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाने विजय साकारला.
‘‘मेस्सीने रचलेला विक्रम प्रशंसनीय आहे. काही खेळाडूंना हा विक्रम मोडण्यासाठी सहा-सात मोसम लागतील. पण मेस्सीने एकाच मोसमात हा विक्रम प्रस्थापित केला. त्याने केलेले काही गोल अद्भूत आहेत,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक टिटो विलानोव्हा यांनी सांगितले.
दरम्यान, एड्रियन लोपेझ आणि अर्डा तुरान यांच्या गोलमुळे अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाने गेटाफेचा २-० असा पराभव करून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. लेव्हान्टेवर १-२ असा विजय मिळवून गतविजेत्या रिअल माद्रिदने २३ गुणांसह तिसरे स्थान प्राप्त केले आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा