अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांच्या चौकशीतून स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी दाऊद इब्राहिमचा हात असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागू लागले आहेत. २००८मध्ये हरभजन सिंगने लगावलेल्या थप्पड प्रकरणानंतर सट्टेबाजांनी श्रीशांतला स्पॉट-फिक्सिंगच्या जाळ्यात अडकवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण या मोसमात तो अखेर सट्टेबाजांच्या गळाला लागला.
स्पॉट-फिक्सिंग प्रकरणासाठी श्रीशांतला अशा पद्धतीने जाळ्यात अडकवण्यात आले
* कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमने सुनील रामचंदानी ऊर्फ सुनील दुबई याला श्रीशांतबाबतची माहिती काढण्याचे आदेश दिले.
* डी कंपनीचे मुंबईतील बेटिंगचे अड्डे चालवणाऱ्या रमेश व्यास या सट्टेबाजाला श्रीशांतला जाळ्यात अडकवण्याचे आदेश अनिस इब्राहिमने दिले.
* रमेश व्यासने कराची कनेक्शनचा वापर करत ही जबाबदारी टिक्कू, भरत आणि ज्युपिटर यांच्यावर सोपवली.
* टिक्कू मंडी ऊर्फ अश्वनी याने राजस्थान रॉयल्सचा माजी खेळाडू अमित सिंग याला फोन करून श्रीशांतबरोबर भेट घालून देण्यास सांगितले.
* अमित सिंगने श्रीशांतचा जवळचा मित्र जिजू जनार्दनशी चर्चा करून श्रीशांतबरोबरची भेट घडवून आणण्यास सांगितले. अखेर जिजूने श्रीशांतशी भेट घडवून आणली.
* सुरुवातीला स्पॉट-फिक्सिंग करण्यासाठी श्रीशांत तयार होत नव्हता. सट्टेबाजांनी त्याला या जाळ्यात आणण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. अखेर जिजूने स्पॉट-फिक्सिंग करण्यासाठी श्रीशांतचे मन वळविले.
* सट्टेबाजांनी मनीष गुडेवार आणि बाबूराव यादव या रणजीपटूंना अजित चंडिलाशी भेट घडवून आणण्यास सांगितले. काही बैठकींनंतर लगेचच चंडिला ‘स्पॉट-फिक्सिंग’साठी तयार झाला.

Story img Loader