मुंबई इंडियन्सने उत्कृष्ट पुनरागमन करत युपी वॉरियर्जचा ६ विकेट्सने पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या विजयासह संघ वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मुंबईचा संघ प्लेऑफपासून अवघी काही पावलं दूर आहे. युपीने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने १८.३ षटकांत ४ विकेट्स गमावत १५३ धावा करत शानदार विजय मिळवला. मुंबईकडून विकेटकिपर यस्तिका भाटियाने विजयी चौकार लगावत संघाचा विजय निश्चित केला.

मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण युपीच्या सलामी जोडीने सुरूवातीच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली. आठव्या षटकात ७४ धावांवर युपीने पहिली विकेट गमावली. तर पहिलाच WPL सामना खेळणाऱ्या जॉर्जिया वॉलची ९० धावांवर विकेट गमावल्यानंतर मुंबईच्या संघाने पुनरागमन केलं. उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या जॉर्जिया वॉलने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले. जॉर्जियाने ३३ चेंडूत १२ चौकारांसह ५५ धावा केल्या आणि संघाला ग्रेस हॅरिस (२८) च्या जोडीने चांगली सुरूवात करून दिली.

पण युपीचे इतर फलंदाज चांगल्या सुरूवातीचे रूपांतर मोठ्या धावसंख्येत करण्यात अपयशी ठरले. या दोन्ही खेळाडूंनंतर दीप्ती शर्माने २७ धावा तर सोफी एकलस्टनने १६ धावा करत संघाला १५० धावांचा टप्पा गाठून दिला. मुंबईकडून अमेलिया कर हिने ४ षटकांत ३८ धावा देत ५ विकेट्स घेतले आहेत. वुमन्स प्रीमियर लीगमधील आणि मुंबई इंडियन्ससाठी तिने पहिल्यांदा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. अमेलिया केरशिवाय मुंबईकडून हॅली मॅथ्यूजने २ विकेट्स तर नताली स्किव्हर ब्रंट आणि पारूनिका सिसोदिया हिने प्रत्येकी १ विकेट मिळवली.

युपीने दिलेल्या १५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या संघात मोठा बदल पाहायला मिळाला. फॉर्मात नसलेल्या यस्तिका भाटिया हिच्या जागी अमेलिया केर हिला हिली मॅथ्यूजसह सलामीला पाठवण्यात आले. पण दौन चौकारांसह १० धावा तर अमेलिया बाद झाली. यानंतर हिली आणि नताली यांनी संघासाठी मॅचविनिंग भागीदारी रचली. हिली मॅथ्यूजने ४६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ६८ धावांची शानदार खेळी केली. तर ऑरेंज कॅप असलेल्या नताली स्किव्हर ब्रंट हिने २३ चेंडूत ७ चौकारांसह ३७ धावा केल्या.

यानंतर हरमनप्रीत कौर ४ धावा करून बाद झाल्यानंतर अमनज्योत कौर हिने १२ धावा आणि यस्तिका भाटिया हिने १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला. युपीकडून ग्रेस हॅरिसने २ विकेट्स तर शनेल हेनरी आणि क्रांती गौड यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.

Story img Loader