मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने मंगळवारी पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएल २०२१च्या ४२ व्या सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजीने इतिहास रचला. पोलार्डने सामन्यातील आपल्या पहिल्याच षटकात ख्रिस गेल आणि केएल राहुलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राहुलची विकेट घेत पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या ३०० विकेट्स पूर्ण केल्या.
पोलार्ड टी-२० मध्ये १० हजार धावा तसेच ३०० विकेट घेणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. सर्वाधिक टी-२० ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम पोलार्डच्या नावावर आहे. तो १५ वेळा टी-२० ट्रॉफी जिंकणाऱ्या संघांचा भाग आहे. त्याच्याशिवाय ड्वेन ब्राव्होने या फॉरमॅटमध्ये हा पराक्रम केला आहे.
या सामन्यापूर्वी पोलार्डने ५६४ टी-२० सामन्यांमध्ये ३२ च्या सरासरीने ११२०२ धावा केल्या आहेत. जगातील केवळ पाच खेळाडू १० हजारांहून अधिक धावा करू शकले आहेत. त्याने एक शतक आणि ५६ अर्धशतके केली आहेत. ७०७ चौकार आणि ७५७ षटकार या क्रिकेटच्या प्रकारात पोलार्डच्या नावावर आहेत.
हेही वाचा – इंझमामला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सचिननं केलं ट्वीट; म्हणाला, ‘‘तू नेहमीच..”
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या ८८ सामन्यांमध्ये त्याने २५ च्या सरासरीने १३७८ धावा केल्या आहेत. यात त्याने ६ अर्धशतके केली आहेत. इथेही त्याने ८० चौकार आणि ९३ षटकार मारले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात एका षटकात ६ षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होच्या नावावर टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे. त्याने ५४६ विकेट्स घेतल्या आहेत.