पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांना व्हिसा देण्यावरून भारतात वादंग निर्माण झाल्याने मियांदाद यांनी भारताचा नियोजित दौरा रद्द केला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुलीशी मियांदाद यांच्या मुलाचा विवाह झाल्याने मियांदाद यांना व्हिसा देण्यावरून भाजप आणि शिवसेनेने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
दिल्लीत होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला उपस्थित राहण्यासाठी मियांदाद भारतात येणार होते. मात्र कोणत्याही प्रकारचा वाद टाळण्यासाठी त्यांनी भारत दौरा रद्द केला असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
क्रिकेटच्या खेळावरून दुसऱ्याच घटनांवर लक्ष केंद्रित व्हावे, अशी पाकिस्तान क्रिकेट मंडळाची इच्छा नाही. मियांदाद यांना व्हिसा देण्याचा निर्णय घेण्यात आल्यापासून भारतात वादंग निर्माण झाला आहे, त्यामुळेच मियांदाद यांचा दौरा रद्द करण्यात आल्याचे पाक क्रिकेट मंडळाचे म्हणणे आहे.
तथापि, ज्यांना व्हिसा देण्यात येऊ नये अशा व्यक्तींच्या यादीत मियांदाद यांचे नाव नाही, असे स्पष्ट करून सरकारने मियांदाद यांना व्हिसा मंजूर करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित व्यक्तीला व्हिसा दिल्याने दोन देशांमधील संबंध सुधारण्यास मदत कशी होईल, असा सवाल भाजप-शिवसेनेने केला होता.

Story img Loader