Former England captain Michael Atherton : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार गोलंदाजी केली. बुमराहने सामन्याच्या पहिल्या डावात ६ तर दुसऱ्या डावात ३ विकेट घेतल्या. या सामन्यादरम्यान बुमराहने ज्या चेंडूंवर आधी ऑली पोप आणि नंतर बेन स्टोक्सला बाद केले त्या चेंडूंची खूप चर्चा होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही स्टोक्स बुमराहच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला होता. याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल आथर्टनने खुलासा केला आहे की, बेन स्टोक्स बुमराहचा चेंडू समजू शकत नाही.

“बुमराहच्या चेंडूचा वेग समजणे कठीण” –

आथर्टनच्या मते, स्टोक्सला बुमराहचा चेंडू समजून घेण्यात अडचण येत आहे. स्काय क्रिकेटने आथर्टनच्या हवाल्याने म्हटले आहे, “बुमराहच्या चेंडूचा वेग समजणे कठीण आहे आणि मी स्टोक्सबरोबर हे घडताना पाहिले आहे. इतर वेळी तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो. त्याने बुमराहच्या चेंडूचा सामना करताना घाई केली आहे. त्याचा वेग समजून घेण्यासाठी तो संघर्ष करत आहे. तसेच जेव्हा-जेव्हा बुमराहने त्याला बाद केले, तेव्हा असे दिसले की चेंडू खाली राहत आहे. पण बुमराहच्या वेगाने स्टोक्सवर वर्चस्व गाजवले आहे.”

‘तो एक शानदार यॉर्कर होता” –

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात बुमराहने ऑली पोपला शानदार यॉर्करवर क्लीन बोल्ड केले होते. सध्या याचीही बरीच चर्चा होत आहे. याबाबत आथर्टन म्हणाले की, फलंदाज यावर काहीच करू शकत नाही. त्याने मान्य केले, ”तो एक शानदार यॉर्कर होता. ऑली पोप या चेंडूवर फारसे काही करू शकले नसते. हा चेंडू पाहणे खरोखरच अप्रतिम होते.”

हेही वाचा – U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी

जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाले, तर त्याने विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात ४५ धावांत सहा खेळाडू बाद केले होते. तर दुसऱ्या डावात भारतीय वेगवान गोलंदाजाने ४६ धावांत ३ विकेट्स घेत टीम इंडियाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. बुमराहला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. बुमराहने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही एकूण सहा विकेट घेतल्या होत्या. आता पुढच्या सामन्यात बुमराह आपला फॉर्म कायम ठेवू शकतो की नाही हे पाहायचे आहे.