ब्रिस्बेनमध्ये ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १३ सदस्यीय ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार मायकेल क्लार्कचे नाव तात्पुरते सामील करण्यात आले आहे. डाव्या मांडीला झालेल्या दुखापतीतून त्याला पूर्णपणे सावरता यावे, यासाठी हे प्रयोजन करण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख रॉडनी मार्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लार्कला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी दोन दिवसांची (बुधवापर्यंत) मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर त्याला २८-२९ नोव्हेंबरला भारताविरुद्ध होणारा सराव सामना खेळावा लागणार आहे.
‘‘मंगळवारपासून सुरू होणाऱ्या शेफिल्ड शिल्ड क्रिकेट सामन्यांमध्ये क्लार्कने खेळावे, अशी आमची इच्छा होती. परंतु या सामन्यात खेळण्याइतपत तो सज्ज झालेला नाही. परंतु बुधवापर्यंत त्याला आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे,’’ असे मार्श यांनी सिडनी येथे प्रसारमाध्यमांना सांगितले.
‘‘मायकेल हा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत तो खेळण्यासाठी १०० टक्के तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. याकरिता दोन दिवसीय सराव सामन्यात त्याला खेळावे लागणार आहे,’’ असे मार्श यांनी सांगितले. क्लार्क खेळू न शकल्यास राखीव फलंदाजाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या संघात स्थान दिलेले नाही.
डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यांच्या जागी दुखापतीतून सावरलेल्या शेन वॉटसन आणि रयान हॅरिस यांना ऑस्ट्रेलियाने संघात स्थान दिले आहे. कसोटी पदार्पणासाठी उत्सुक असलेल्या जोश हॅझलवूडचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ-
मायकेल क्लार्क (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, स्टीव्ह स्मिथ, ब्रॅड हॅडिन, मिचेल मार्श, रयान हॅरिस, जोश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, नॅथन लिऑन, पीटर सिडल.
आरोनची लक्ष्यवेधी गोलंदाजी; क्रिकेट ऑस्ट्रेलिया २१९ धावांत गारद
अॅडलेड : वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरणाऱ्या वातावरणाचा योग्य फायदा उचलत वरुण आरोनच्या नेतृत्वाखालील भारताच्या तेजतर्रार माऱ्याने अननुभवी क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाचा डाव फक्त २१९ धावांत गुंडाळला. अॅडलेड येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी आरोनने लक्ष्यवेधी गोलंदाजी करीत ७२ धावांत ३ बळी घेतले आणि पहिल्या कसोटीसाठी दावेदारी केली. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला सुरेख साथ दिली. त्यानंतर भारताने शिखर धवनला (१०) गमावून १ बाद ५५ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा मुरली विजय ३२ आणि चेतेश्वर पुजारा १३ धावांवर खेळत होते.
भारताविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश
ब्रिस्बेनमध्ये ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १३ सदस्यीय ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार मायकेल क्लार्कचे नाव तात्पुरते सामील करण्यात आले आहे.
First published on: 25-11-2014 at 02:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael clarke in australia squad for first test against india