इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू मायकेल ओवेन याने यंदाच्या मोसमानंतर व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. ओवेन याने स्वत:च्या वेबासाईटवर ही माहिती दिली आहे. त्याने म्हटले आहे, व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून मला भरपूर संधी मिळाली आणि आजपर्यंतच्या कारकिर्दीबाबत मी खूप समाधानी आहे. त्यामुळेच अतिशय आनंदी मनाने मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. लिव्हरपूल संघाकडून मला १७ व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू म्हणून प्रथम संधी मिळाली. त्यांचा मी मनोमन आभारी आहे. त्यानंतर मी रिअल माद्रिद, न्यू कॅसल युनायटेड, मँचेस्टर युनायटेड व स्टोक सिटी या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली.
ओवेन याने इंग्लंडकडून ८९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले. ३३ वर्षीय खेळाडू ओवेन याने या सामन्यांमध्ये ४० गोल केले.
मला कारकिर्दीत अनेक युवा खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली. या सर्वानी मला अतिशय चांगले सहकार्य केले. त्यामुळेच माझी कारकीर्द घडू शकली. इंग्लंड संघ व अन्य व्यावसायिक संघाच्या सर्व सपोर्ट स्टाफचे मला अतिशय चांगले सहकार्य लाभले. तसेच मला अनेक वर्षे प्रायोजकत्व करणाऱ्या विविध उद्योगसंस्थांचेही माझ्यावर खूप ऋण आहे. हे ऋण फेडणे अशक्य आहे, असे ओवेन यांनी सांगितले.

Story img Loader