फ्रान्समधील आल्प्स पर्वतात स्कीइंग करताना मेंदूला झालेल्या दुखापतींमुळे फॉम्र्युला-वनमधील महान ड्रायव्हर मायकेल शूमाकर अद्याप कोमातच आहे. ग्रेनोबल येथील रुग्णालयात तिसरा दिवस घालवल्यानंतरही शूमाकरची प्रकृती चिंताजनक आहे. नवीन वर्षांत पदार्पण केले तरी शूमाकरच्या जीवाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्याच्या मेंदूतील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. शूमाकरला वाचवण्यासाठी डॉक्टरांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू असली तरी शूमाकरच्या भवितव्याविषयी ते खात्रीलायकपणे काहीही सांगू शकत नाहीत. सात वेळा विश्वविजेता ठरलेला शूमाकर रविवारी स्कीइंग करताना घसरून दगडावर आदळला होता. या घटनेने क्रीडाविश्व आणि फॉम्र्युला-वन चाहते हळहळले असतानाच शूमाकरची जीव वाचवण्यासाठीची झुंज कायम आहे. मंगळवारी शूमाकरच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली होती. त्यामुळे त्याच्यावर दोन तासांची दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. पण त्याचा जीवाचा धोका टळलेला नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. ग्रेनोबल येथील रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख जीन-फ्रँकोईस पायेन म्हणाले, ‘‘शूमाकरविषयी सध्या तरी आम्ही कोणतेही भाष्य करणार नाही. त्याच्या मेंदूतील रक्ताच्या गाठी आम्ही काढून टाकल्या, ही समाधानाची बाब असली तरी त्याला रुग्णालयातून हलवण्याचा धोका आम्ही पत्करणार नाहीत.’’

Story img Loader