इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत (आरसीबी) प्रतिक्रिया दिली होती. आता त्याने विराटनंतर आरसीबीची कमान कोणाच्या हातात द्यावी, याबाबत मत दिले आहे. वॉन म्हणाला, ”विराटनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन कर्णधार निवडणे सोपे होणार नाही. कारण यासाठी फ्रेंचायझीला एक असा खेळाडू शोधावा लागेल, ज्यात जबाबदारी हाताळण्याचे योग्य कौशल्य असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो कोहलीसारख्या मोठ्या खेळाडूचे नेतृत्व करू शकेल.” आरसीबी कर्णधार म्हणून कोहलीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम होता. मात्र तो खेळाडू म्हणून या फ्रेंचायझीचा भाग राहील.

वॉनने क्रिकबझला सांगितले की, ”आरसीबीमध्ये विराटचा कर्णधार बनणाऱ्या खेळाडूमध्ये सर्वात मोठी गुणवत्ता म्हणजे त्याला त्याचा खेळ माहीत असतो. तसेच, त्याला टी-२० क्रिकेटचे बारकावे समजतात आणि लोकांना विशेषतः विराट कोहलीसारख्या दिग्गज खेळाडूला कसे हाताळावे हे माहीत आहे.”

हेही वाचा – KKRचा खेळाडू सुनील नरिनबाबत धक्कादायक बातमी..!; मुंबई इंडियन्सच्या पोलार्डनं दिली माहिती

”आरसीबीचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी मी एका खेळाडूचे नाव देईन. नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो दुसर्‍या फ्रेंचायझीचा आहे आणि २०२२ मध्ये होणाऱ्या मेगा लिलावात त्याच्या संघाकडून त्याला कायम ठेवले जाऊ शकते. पण जोस बटलरला आरसीबीचा नवा कर्णधार व्हायला आवडेल. त्याच्याकडे सर्व गुण आहेत, जे त्याला महेंद्रसिंह धोनीसारखा कर्णधार बनवू शकतात. मला याबद्दल कोणतीही शंका नाही”, असे वॉनने म्हटले.

बटलर सध्या राजस्थान रॉयल्ससोबत आहे. मात्र, बाबा झाल्यामुळे तो आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात एकही सामना खेळला नाही.

Story img Loader