माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचे प्रशिक्षक होणार असल्याची बातमी समोर येताच जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. टी-२० विश्वचषकानंतर द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी घेणार असल्याचे वृत्त आहे. त्याचे पहिले मोठे ध्येय न्यूझीलंडविरुद्ध घरची मालिका असेल. मात्र, बीसीसीआयने अद्याप यावर अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. पण इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने उर्वरित देशांना आधीच इशारा दिला आहे.
वॉनने ट्विटरवर लिहिले, “राहुल द्रविड टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल, हे खरे असेल तर बाकीच्या देशांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.” द्रविडचे प्रशिक्षक बनल्याची बातमी समोर आल्यानंतर वॉनसोबत माजी भारतीय फलंदाज वसीम जाफरनेही एक मजेदार ट्विट केले.
जाफरने लिहिले, ”कालपर्यंत राहुल द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) राहील असे वृत्त होते, पण आज सकाळी तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनत असल्याचे समोर आले. मग मध्यरात्री काय झाले? माझा अंदाज असा आहे की लॉर्ड शार्दुलने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी केकवर मेणबत्त्या पेटवल्या आणि त्याला राहुल भाईला प्रशिक्षक करण्यास सांगितले. कदाचित त्याची इच्छा पूर्ण झाली असेल.”
हेही वाचा – ये दिल मांगे राहुल..! द्रविडबाबत ‘तो’ खुलासा होताच नेटकऱ्यांचा सोशल मीडियावर जल्लोष
४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्याने श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केल आहे. द्रविड १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षणही देत आहे. अशाप्रकारे द्रविडला मुख्य संघाला प्रशिक्षण देण्यासाठी विचारणा झाल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मात्र द्रविडने तरुणांना क्रिकेटचे धडे देण्याला आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहण्याला प्राधान्य दिले आहे. यापूर्वीही द्रविडने २०१६ आणि २०१७ साली अशाच पद्धतीची ऑफर नाकारली होती.