३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी प्रत्येक संघ आपल्या अंतिम संघाची घोषणा करतो आहे. यजमान इंग्लंडने आपल्या संभाव्य संघाची घोषणा केली आहे. मात्र अष्टपैलू जोफ्रा आर्चरला या संघात स्थान न मिळाल्यामुळे इंग्लंडच्या सर्वच माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

कॅरेबियन बेटांवर जन्मलेल्या जोफ्रा आर्चरने काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या वन-डे संघात पदार्पण केलं होतं. सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामातही जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्स संघाकडून चांगली कामगिरी करतो आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन जोफ्रा आर्चरच्या इंग्लंड विश्वचषक संघातील निवडीबद्दल आश्वस्त आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर जोफ्राला पाठींबा देताना वॉनने, जोफ्राची संघात निवड झाली नाही तर मी नग्न होणं पत्करेन असं वक्तव्य केलं आहे.

इंग्लंडच्या प्राथमिक संघात निवड झाली नसली, तरीही जोफ्रा आर्चरला अंतिम संघात स्थान मिळवण्याची संधी आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार २६ एप्रिल रोजी आर्चर मायदेशी रवाना होईल. ८ मे पासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत चांगली कामगिरी करुन संघात आपलं स्थान बळकट करण्याची संधी आर्चरकडे असणार आहे. या संधीचं सोनं आर्चर करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.