Maybe Pakistans batters need to be a bit more selfish like Virat: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतून पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तान बाहेर पडल्यापासून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. काल बाय बाय पाकिस्तान सोशल मीडियावरही ट्रेंड करत होता. अलीकडे कोहलीने शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने विराटला स्वार्थी म्हटले होते. तेव्हापासून हाफिजला सोशल मीडियावर खूप ट्रोलला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकेल वॉननेही हाफिजची खूप मजा घेतली आहे. आता पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर मायकल वॉनने पुन्हा एकदा हाफिजवर निशाणा साधत खिल्ली उडवली आहे.

‘…तर पाकिस्तान उपांत्य फेरीतून बाहेर पडला नसता’

मायकल वॉनने आपल्या एक्स हँडलवरून हाफिजची मजा घेण्यासाठी ट्विट केले आहे. तो म्हणाला की, ‘जर पाकिस्तानचे फलंदाजही विराट कोहलीसारखे थोडेसे स्वार्थी असते, तर बरे झाले असते.’ त्याचबरोबर या पोस्टमध्ये मायकल वॉनने मोहम्मद हाफिजला मेन्शन केले. अशा प्रकारे वॉनने विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. मायकल वॉन म्हणाला, जर पाकिस्तानचे खेळाडू विराटसारखे थोडेसे स्वार्थी असते, तर पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले नसते. काल इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक साखळी सामन्यात पराभूत होऊन पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला.

खरंतर, विराट कोहलीने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. विराटने १२१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या होत्या, ज्याला पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने स्वार्थी म्हटले होते. तो म्हणाला की, कोहली संघाच्या गरजेपेक्षा वैयक्तिक कामगिरीला अधिक प्राधान्य देत आहे.
मायकेल वॉनने यावर प्रतिक्रिया देत याला ‘निंदनीय मूर्खपणा’ म्हटले आहे. कोहलीच्या डावाचा बचाव करताना तो म्हणाला की, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या या अवघड खेळपट्टीवर कोहलीची भूमिका महत्त्वाची होती.

हेही वाचा – Team India: भारतीय संघाची धमाल दिवाळी पार्टी, पत्नी आणि मुलांसह लावली हजेरी, पाहा VIDEO

पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध पत्कारावा लागला दारुण पराभव –

पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शेवटची संधी मिळाली होती. पाकिस्तानने इंग्लंडचा २८७ धावांनी पराभव केला असता, तर न्यूझीलंडल उपांत्य फेरीतून बाहेर झाले असते, पण नाणेफेकही पाकिस्तानच्या बाजूने गेली नाही. पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यामुळे त्यांना प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. पण पाकिस्तानच्या खेळाडूंनाही चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे पाकिस्तान जिंकू शकला नाही, एकतर्फी सामना जिंकणे, तर सोडा लाजिरवाणा पराभव स्विकारत उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले.