भारताने इंग्लंड विरुद्धचा एजबस्टन कसोटी सामना गमावला. त्यामुळे १५वर्षांनंतर ब्रिटिश भूमीत कसोटी मालिका जिंकण्याची संधी हुकली. त्यानंतर आता आजपासून (७ जुलै) इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी २० मालिका सुरू होत आहे. मात्र, यासर्व घडामोडींपेक्षा सर्वात जास्त चर्चा ही विराट कोहलीची सुरू आहे. जवळपास गेल्या दोन वर्षांपासून भारताचा माजी कर्णधार खराब फॉर्मशी झुंज देत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावर टीका आणि सल्ल्यांचा भडिमार सुरू झाला आहे. आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने विराटला सल्ला दिला आहे.
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात टी २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वचषकासाठी जाणाऱ्या भारतीय संघात विराट कोहलीला स्थान मिळणार की नाही, याबाबत आतापासून अटकळी लावल्या जात आहे. या दरम्यान, मायकेल वॉनने विराट कोहलीला तीन महिने क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
मायकल वॉन म्हणाला, “मी विराटकडे एक विशेष खेळाडू म्हणून बघतो. आयपीएलच्या शेवटी त्याला थोडी विश्रांती मिळाली आहे. पण, त्याच्याकडे बघून मला असे वाटते की अजूनही त्याला विश्रांतीची गरज आहे. त्याने तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे. कुटुंबासोबत वेळ घालवावा. तीन महिन्याच्या विश्रांतीने नक्की त्याला मदत होईल.”
बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात विराट कोहली भारतीय संघात होता. या सामन्याच्या दोन्ही डावात तो केवळ ३१ धावाच करू शकला. कोहलीने नोव्हेंबर २०१९ पासून कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावलेले नाही. यादरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेतूनही त्याला वगळण्यात आले आहे.