ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मायकल क्लार्कला त्याच्या प्रेयसीने मारहाण केली आहे. माजी कर्णधाराने प्रेमात धोका दिल्याचा आरोप प्रेयसी जेड यारब्रॉज हिने केला आहे. मायकल क्लार्क आणि जेड यारब्रॉज यांचा भांडणाचा व्हिडीओ समाज माध्यमांत व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी मायकल क्लार्कवर कारवाई केली आहे.
क्वीसलैंड पोलिसांनी मायकल क्लार्क आणि त्याच्या प्रेयसीवर दंडात्मक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. “नूसाविले पार्कमध्ये ३० वर्षाची महिला आणि ४१ वर्षाच्या पुरुषामध्ये मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी चौकशी करण्यात आली. ही चौकशी केल्यानंतर दोघांवर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच, हे प्रकरण बंद करण्यात आलं आहे,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा : ‘थप्पड से डर नही…’ गर्लफ्रेंडकडून फटके खाल्यानंतर मायकेल क्लार्कला BCCI देणार झटका?
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये फेब्रुवारी महिन्यात कसोटी सामना होणार आहे. या सामन्यासाठी मायकल क्लार्क समालोचक पॅनेलचा भाग होता. पण, प्रेयसीबरोबर झालेली मारहाण समोर आल्यानंतर, बीसीसीआय क्लार्कला पॅनेलमधून वगळण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो रुपयांचा फटका मायकल क्लार्कला बसण्याची शक्यता आहे.