काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी २० विश्वचषकानंतर संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर विराटने केलेली ही गोष्ट त्याच्या चाहत्यांबरोबरच जगभरातील क्रिकेट विश्वाला धक्का देणारी होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये कोहलीने संघ सहकाऱ्यांसोबत केलेल्या वर्तवणूकीची तक्रार एका वरिष्ठ खेळाडूने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयकडे केली होती. या तक्रारीच्या माध्यमातून भारतीय संघामध्ये फूट पडल्याचं दिसून आल्याचं म्हटलं जात आहे.
नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB च्या चाहत्यांसाठी मात्र…
क्रिकेट नेक्स्टने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघातील एका वरिष्ठ खेळाडूने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात विराटकडून संघ सहकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल आक्षेप नोंदवला होता. कोहलीच्या नेतृत्वाबद्दलही शंका उपस्थित करण्यात आली होती.
कोहलीने टी २० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असून यामागे त्यावर तिन्ही प्रकारांमध्ये नेतृत्व करत असल्याने आलेला कामाचा ताण कमी करण्याचा हेतू असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने विराटला कर्णधारपदावरहून हटवण्यासाठी नियोजन केलं होतं. विराटकडे संघाचं नेतृत्व आल्यापासून भारतीय संघाला आयसीसी म्हणजेच आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धांमधील एकही चषक जिंकला आलेला नाही. यावरुन बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी त्याच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली. याच कारणामुळे संघामधून विराटला विरोध होण्यास सुरुवात झाली. ड्रेसिंग रुममध्ये विराटकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे अनेक वरिष्ठ खेळाडू नाराज असल्याच्या बातम्याही समोर आल्या. काही वेबसाईट्सने दिलेल्या माहितीनुसार आर अश्विन अशाच नाराज खेळाडूंपैकी एक होता. मात्र अश्विनच्या नावासंदर्भातील या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून काहीतरी निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यानेच विराटने राजीनामा दिला का यासंदर्भातील चर्चाही सुरु झाल्या आहेत.
नक्की वाचा >> IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर
एका वरिष्ठ खेळाडूने कोहलीमुळे आपल्याला असुरक्षित वाटत असल्याची तक्रार बीसीसीआयच्या सचिवांकडे केली होती. इंग्लंडविरोधातील मालिकेमध्ये अश्विनला एकाही सामन्यात अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळालं नव्हतं. चौथ्या कसोटीमध्ये अश्विन खेळेल असं प्रशिक्षक असणाऱ्या रवी शास्त्री यांनी स्पष्ट केलं असतानाही अश्विनला संधी देण्यात आली नाही.