भारताचं नाव आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात विश्वामध्ये अभिमानानं प्रस्थापित करणारे ‘फ्लाईंग सिख’ असं बिरूद मानानं मिरवणारे आणि ज्यांच्या कामगिरीचा ५ दशकांनंतर आजही देशवासीयांना अभिमान वाटतो ते भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं शुक्रवारी रात्री उशिरा निधन झालं. त्यांच्या जाण्यामुळे गेल्या ५ दशकांपासून त्यांच्यापासून प्रेरणा घेतलेल्या सर्वच स्तरातील भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर सेलिब्रिटी विश्वापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत आणि क्रीडाविश्वापासून उद्योग जगतापर्यंत अनेक मान्यवरांनी मिल्खा सिंग यांच्या निधनावर भावनिक प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे. आपल्या संवेदनशील ट्वीट्समधून सामाजिक, राजकीय अशा सर्वच विषयांवर व्यक् होणारे महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनीही मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोकाकूल शब्दांमध्ये ट्वीट केलं आहे.
मिल्खा सिंग फक्त अॅथलेट नव्हते…!
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटमध्ये मिल्खा सिंग यांचं त्यांच्यासाठी कोण होते, यावर भाष्य केलं आहे. “माझी पिढी हे कसं समजावून सांगू शकेल की मिल्खा सिंग आमच्यासाठी कोण होते? ते फक्त अॅथलेट नव्हते. वसाहतवादामधून बाहेर पडून देखील ज्या समाजामध्ये अजूनही असुरक्षितता होती, त्या समाजासाठी मिल्खा सिंग एक प्रतिक होते…आपण जगात सर्वोत्तम होऊ शकतो याचं. धन्यवाद मिल्खा सिंगजी, आम्हाला तो आत्मविश्वास देण्यासाठी. ओम शांती”, अशा शब्दांत आनंद महिंद्रा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
How can my generation explain what Milkha Singh meant to us?
He wasn’t just an athlete. To a society still suffering the insecurities of post-colonialism he was a sign that we could be the best in the world. Thank you, Milkha Singhji, for giving us that confidence. Om Shanti— anand mahindra (@anandmahindra) June 18, 2021
काही दिवसांपूर्वीच झालं होतं पत्नीचं निधन
गेल्याच महिन्यात मिल्खा सिंग यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार झाले. आठवडाभराच्या उपचारांनंतर त्यांना घरी देखील सोडण्यात आलं होतं. पण त्यानंतरही त्यांची ऑक्सिजन पातळी खाली जाऊ लागली. त्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चंदीगडच्या पीजीआयएमईआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. गेली ५ दशकं देशाला अभिमान देणाऱ्या लढवय्याचं निधन झालं. काही दिवसांपूर्वीच मिल्खा सिंग यांच्या पत्नीचंही निधन झालं होतं. त्या दु:खातून सावरत असतानाच त्यांना करोनानं घेरलं. त्यापाठोपाठ आलेल्या शारिरीक व्याधींमुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.
फाळणीच्या जखमा ते एका सेकंदाने हुकलेलं पदक… असा आहे मिल्खा सिंग यांचा खडतर संघर्ष
मिल्खा यांचे विक्रम
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.